'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...'; पराभवानंतर राजेश टोपेंनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:59 PM2024-11-25T14:59:42+5:302024-11-25T15:00:29+5:30
माजी मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर सुरेश भटांची गझल पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अंबड : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या पंचवार्षिकमध्ये काटे की टक्कर झाली. अत्यंत चुरशीचे झालेल्या लढाईत विद्यमान आमदार माजी मंत्री राजेश टोपे यांचा निसटता पराभव झाला. परंतु, त्यांचा हा पराभव त्यांच्या समर्थकांना धक्कादायक असा होता. सर्वजण या निकालाकडे आश्चर्यकारकपणे पाहत आहेत. खुद्द राजेश टोपेदेखील या पराभवामुळे व्यथित झाले आहेत. एका ध्वनी संदेशाद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगूज साधले आहे. पुन्हा नव्या उमेदीने चुका सुधारून पुढे जाऊ. कार्यकर्त्यांनी संयम राखून भावनिक न होता हिमतीने आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन केले आहे. आपण नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेलो आहे हे त्यांनी नमूद केले.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर सुरेश भटांची गझल पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दुर्दम्य आशावाद व्यक्त करणाऱ्या या काव्यपंक्तीतून नव्या उमेदीने, उत्साहाने, सामर्थ्याने उभे राहू हा आशावाद व्यक्त केला आहे. पदोपदी विरोधकांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण या अडथळ्यांवर मात करून पुढे जाऊ असे सूचित केले आहे. राजकीय आयुष्यात असे चढउतार येतच असतात ही जाणीव या निमित्ताने या काव्यपंक्तीच्या माध्यमातून टोपे यांनी व्यक्त केली आहे.
अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही
राजेश टोपे यांनी कवी सुरेश भट यांची कविता समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही.. ही कविता राजेश टोपे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे.