दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के
By विजय मुंडे | Published: June 2, 2023 06:13 PM2023-06-02T18:13:14+5:302023-06-02T18:14:58+5:30
जालना जिल्हा विभागात तिसरा; १५ हजार मुले, १२ हजार मुली उत्तीर्ण
जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. जिल्ह्याचा ९३.२५ टक्के निकाल लागला असून, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील १५ हजार १९० मुलं आणि १२ हजार ९९५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.७९ तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.१७ आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात जालना जिल्ह्याचा निकाल तिसऱ्या स्थानी आहे.
जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभाग, पोलीस दलासह इतर प्रशासकीय विभागाच्या वतीने संयुक्त प्रयत्न करण्यात आले होते. कॉपीमुक्त परीक्षेमुळे जिल्ह्याच्या निकालाचा टक्का घसरतो की काय अशी चिंता अनेकांना होती. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदाही जिल्ह्याचा दहावीचा निकाल समाधानकारक ९३.२५ टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ३० हजार ४५१ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी ३० हजार २२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, २८ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ६६० मुलांनी व १३ हजार ५६५ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १५ हजार १९० मुलं आणि १२ हजार ९१५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.१७ टक्के तर मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे. निकाल जाहीर होताच शाळा, महाविद्यालयांच्या वतीने गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
४५ टक्के रिपिटर उत्तीर्ण
जिल्ह्यातील ३६६ रिपिटर (पुर्नपरीक्षार्थी) मुलांनी परीक्षा दिली होती. यात २४९ मुले व ११७ मुलींचा समावेश होता. त्यातील ११२ मुलं व ५५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. रिपिटर उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४५.६२ टक्के आहेत. त्यात मुलांचे प्रमाण ४४.९७ टक्के तर तर मुलींचे प्रमाण ४७ टक्के आहे.
११ जणांवर झाली होती कारवाई
दहावीच्या परीक्षेत गैरमार्गाने कॉपी करणाऱ्या ११ जणांवर पथकांकडून कारवाई करण्यात आली होती. तर जिल्ह्या परीक्षेत्तर गैरप्रकार १७ झाल्याची नोंद राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे आहे.
तालुकानिहाय निकाल
तालुका- टक्केवारी
जालना : ९०.७८
बदनापूर: ९३.२५
अंबड: ९३.२२
परतूर : ९२.४७
घनसावंगी : ८९.०३
मंठा : ९२.१५
भोकरदन : ९७.५०
जाफराबाद : ९६.९२