नामधारी कोण, मालक कोण हे सर्वांना माहिती आहे; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:06 PM2024-08-20T14:06:43+5:302024-08-20T14:07:22+5:30
तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे राजकारणा शिवाय पर्याय नाही: मनोज जरांगे
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : त्या तिघांचा एक कावा आहे. ते एकमेकांविरोधात बोलूच शकत नाहीत. नामधारी कोण मालक कोण हे सर्वांना माहिती आहे. फडणवीसांनी ठरवले तर ते एका दिवसांत आरक्षण देऊ शकतात. गृहमंत्री फडणवीस यांचे राज्य म्हणजे जोक ना, काही दिवसांनी यांनी गरिबांना भाकरीला मोताज करू नये, असा हल्लाबोल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ते अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
जरांगे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यांना आणखी चार दोन दिवस वाढवून द्यावेच लागतील. पश्चिम महाराष्ट्रातून गर्दी जास्त येते आहे. काही मंत्री आणि माजी खासदार, आमदार देखील संपर्कात असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. सत्तेकडे गोरगरीब गेल्या शिवाय मार्ग निघू शकत नाही. तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे राजकारणा शिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.
जरांगे यांना पोलिसांची नोटिस
मनोज जरांगे पाटील यांना गेवराई पोलीसांनी नोटिस बजावली आहे. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, ती फडणवीस यांची नोटीस आहे, पोलीसांची नाही. ग्रहमंत्रालया बरोबर, त्यांना संपवा संपवी खात दिले पाहिजे. काल ताबडतोब नोटीस दिली, ते जुने उकरून काढतात, अशी टीका जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केली.