अपघाताने हिरावले दोन्ही कुटुंबांचे सर्वस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:44 AM2018-03-01T00:44:29+5:302018-03-01T00:44:32+5:30
भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.
राजू छल्लारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.
सार्थकचे वडील राजू थेटे यांना गावाजवळच २० एकर कोरडवाहू शेती आहे. गावात त्यांचे स्वत:चे साधे घर आहे. शेतात कापूस, तूर ही पिके आहेत. त्यांना वैष्णवी (७वी), पार्थ (४ थी) , गायत्री (१ ली) अशी तीन अपत्ये आहेत. ही सर्व मुले जिल्हा परिषद शाळेत शिकणारी. तर ओंकारचे वडील कृष्णा चोरमारे हे सालगडी म्हणून काम इतराच्या शेतात काम करतात. त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. काही महिन्यांपूर्वी ते कामाच्या शोधात पाथरवाला येथे आले होते. तेथेच त्यांना सालगडी म्हणून काम मिळाल्याने ते येथेच राहू लागले. त्यांना स्वत:चे घर नाही. उत्पन्नाचे कुठलेही दुसरे साधन नाही. म्हणून सालगडी म्हणून ते इतर शेतक-यांच्या शेतात काम करत होते.
बुधवारचा दिवस या दोन्ही कुटुंबांसाठी घातवारच ठरला. नेहमीप्रमाणे ओंकार आणि सार्थक घराजवळच खेळत असताना उसाने भरलेला ट्रक उलटला आणि या दोन्ही मुलांच्या अंगावर संपूर्ण ऊस पडला. यातच दबून या दोन्ही चिमुकल्या जिवांचा करुण अंत झाला. गावक-यांना कळल्यानंतर ते तात्त्काळ मदतीसाठी गेले. दोन्ही मुलांचा जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत या दोन्ही जिवांनी जगाचा निरोप घेतला होता. मुलांचा काहीही दोष नसताना जीव गमवावा लागल्याने दोन्ही मुलांच्या आईवडिलांनी आक्रोश केला. या घटनेनंतर दोन्ही मातांनी फोडलेल्या हंबरड्याने तर उपस्थितांचे हृदय हेलावले होते.