घरात वडिलांचे शव ठेवून सोडविला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:38 AM2018-03-02T00:38:04+5:302018-03-02T00:38:23+5:30
वडिलांचे निधन झाल्यानंतर घरात मृतदेह ठेवून हुंदके देत देतच पेपर देण्याचा दुर्दैवी प्रसंग दहावीची परीक्षा देणा-या मुलावर गुरुवारी ओढवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : वडिलांचे निधन झाल्यानंतर घरात मृतदेह ठेवून हुंदके देत देतच पेपर देण्याचा दुर्दैवी प्रसंग दहावीची परीक्षा देणा-या मुलावर गुरुवारी ओढवला.
शहरातील ज्ञानेश्वर नगरमधील रावसाहेब तळेकर (६५) यांचे गुरुवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. तळेकर यांचा मुलगा दिनेश दहावीची परीक्षा देत आहे.
गुरुवारीच परीक्षेला प्रारंभ झाल्याने दिनेशवर वडिलांचा मृतदेह घरात ठेवून पहिला मराठीचा पेपर देण्याची दुर्दैवी वेळ आली. हुंदके देत पेपर लिहून अर्धा तास अगोदर उत्तरपत्रिका जमा केली आणि तो केंद्रातील कक्षाबाहेर पडला. तोपर्यंत दिनेशसाठी थांंबवण्यात आलेल्या अंत्यविधीस सुरूवात करण्यात आली. अखेर साश्रू नयनांनी दिनेशने आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला.
वडील तर गेले मात्र, आयुष्यातील एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून दिनेशने जीवनातील पहिल्याच परीक्षेला न चुकता सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे कौतुकही होत आहे. मयत रावसाहेब तळेकर यांना दोन मुले, दोन मुली पत्नी असा परिवार आहे.