जपानी मेंदूज्वराच्या कारणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:34 AM2018-02-09T00:34:40+5:302018-02-09T00:35:04+5:30
आॅगस्ट महिन्यात कुंभार पिंपळगाव येथे ‘जपानी मेंदूज्वर’ या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा आजार आजार कसा उद्भवला, याबाबत तपासणी करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील शास्त्रज्ञांचे पथक दोन दिवसांपासून कुंभार पिंपळगावात ठाण मांडून आहे.
कुंभार पिंपळगाव : आॅगस्ट महिन्यात कुंभार पिंपळगाव येथे ‘जपानी मेंदूज्वर’ या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा आजार आजार कसा उद्भवला, याबाबत तपासणी करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील शास्त्रज्ञांचे पथक दोन दिवसांपासून कुंभार पिंपळगावात ठाण मांडून आहे. गुरुवारी पथकाने गावातून डासांचे संकलन केले.
पथकात आरोग्य सहसंचालक कार्यालय पुणे येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. डी. गावंडे, डॉ. के.एस. शेळके, कीटक संहारक व्ही. एस. गवळी, डी. एन. काटे, आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे, वैद्यकीय अधिकारी एस. बी. ढवळे, आरोग्य सहायक बी. ए. काळे, आरोग्य सेवक एकनाथ पोपळघट, डी. डी. कवठेकर, डी. ए. गर्जे यांचा समावेश आहे.
गुरुवारी दोन पथकांनी गावातील काही भागांतून डासांचे संकलन केले, तसेच गावातील जनावरांच्या गोठ्याची तपासणी, जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले.
या आजाराची उत्पत्ती कशी झाली याची कारणे शोधण्यासाठी गाव परिसरात पाच किलोमीटरपर्यंत तपासणी करण्यात आली.
तपासणीत बहुतांश ठिकाणांहून डासांचे संकलन करण्यात आले. संकलन केलेले डास व रक्त नमुने पुणे येथील सहसंचालक प्रयोग शाळेत तपासण्यात येणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात मागील वीस वर्षात जपानी मेंदूज्वर हा आजार जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातील रायपूर येथे आढळून आला होता. कुंभार पिंपळगावात आढळलेल्या जपानी मेंदूज्वराच्या रुग्णानंतर प्रथमच कुंभार पिंपळगावात आॅगस्ट महिन्यात एक रुग्ण आढळून आल्याने राज्य आरोग्य विभागाने याची दखल घेत, ही तपासणी केल्याचे पथकातील तज्ज्ञांनी सांगितले.
-------