जय भवानी शेतकरी गटाच्या चौकशीने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:42+5:302021-09-22T04:33:42+5:30
काँग्रेस पदाधिकारी सुधाकर निकाळजे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत आ. कुचे यांच्या शेतकरी गटाविषयी आरोप केले ...
काँग्रेस पदाधिकारी सुधाकर निकाळजे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत आ. कुचे यांच्या शेतकरी गटाविषयी आरोप केले होते. त्यात जय भवानी शेतकरी गटाशी संबंध नसलेल्या मान देऊळगाव येथील सहा शेतकऱ्यांनी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची थेट भेट घेऊन शपथपत्राद्वारे वस्तुस्थिती दर्शवून दिली होती व या गटाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी आमदार नारायण कुचे यांच्या जय भवानी शेतकरी गटाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनाही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी बदनापूर, मंडळ कृषी अधिकारी बदनापूर तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकल्प सहायक व प्रकल्प विशेषज्ज्ञ हे या जय भवानी शेतकरी गटाची चौकशी करण्यासाठी मान देऊळगावला भेट देणार आहेत.