जालना बाजारात खरेदीचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:48 AM2018-03-19T00:48:42+5:302018-03-19T00:48:42+5:30
मराठी नववर्षाला अनेकांनी वाहन, सोने, गृह खरेदीचा मुहुर्त साधला. त्यानिमित्त रविवारी बाजारात सोने-चांदीच्या दुकानांसह, वाहनांच्या शोरूममध्ये दिवसभर गर्दी दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठी नववर्षाला अनेकांनी वाहन, सोने, गृह खरेदीचा मुहुर्त साधला. त्यानिमित्त रविवारी बाजारात सोने-चांदीच्या दुकानांसह, वाहनांच्या शोरूममध्ये दिवसभर गर्दी दिसून आली.
साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुडी पाडव्याला नवीन वस्तू खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. शहरातील विविध वाहन खरेदीच्या शोरूमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमार्फत विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. महिलांसाठी असलेल्या दुचाकींना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य शोरूमसह तालुका पातळीवर दिवसभरात सुमारे दीड हजारांवर वाहनांची खरेदी झाल्याचा अंदाज विक्रेते राहुल गुप्ता यांनी सांगितले. वाहन खरेदी बाजारात पाडव्यानिमित्त जवळपास चार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याच अंदाज येथील एका शोरूमचे व्यवस्थापक सचिन शाह यांनी व्यक्त केला. मागील वर्षीच्या तुलनेत वाहन बाजरातील उलाढाल वाढल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांचे खास आकर्षण असलेल्या सोने खरेदीला पाडव्यानिमित्त चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी असताना सराफा बाजारात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आली. शुद्ध सोन्याला पाडव्याला ३१ हजार ५०० रुपये, असा दर मिळाला. सोने बाजारात खास महिलांसाठीच्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध दागिन्यांना अधिक मागणी राहिली, असे ज्वेलर्स व्यावसायिक गौतम मुनोत यांनी सांगितले. गुढी पाडव्यानिमित्त अनेकांनी आपल्या नूतन वास्तूंच्या कामाला प्रारंभ केला, तर काहींनी गृह प्रवेशाचा मृहुर्त साधला.
एकंदरीतच गुढी पाडव्याला बाजारात खरेदीच्या उत्साहामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.
गुढी पाडव्यानिमित्त अनेकांनी आपल्या नूतन वास्तूच्या कामाला प्रारंभ केला, तर काहींनी गृह प्रवेशाचा मुहूर्त साधला. यानिमित्त ठिकठिकाणी कार्यकमांचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले. नवीन घर बुकिंंगसाठी नोकरदार व्यक्तींनी मुद्दामहून पाडव्याचा मुहूर्त साधल्याचे येथील बांधकाम व्यावसायिक रितेश मंत्री यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.