तहसीलमध्ये उत्साह; पंचायत समितीत ‘पंचाईत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:17 AM2020-03-04T00:17:50+5:302020-03-04T00:18:08+5:30
घनसावंगी तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या कार्यालयात भेट दिली असता काही ठिकाणी पहिल्या दिवशी उत्साहात कामाला सुरुवात तर काही ठिकाणी धक्कादायक परिस्थिती दिसून आली .
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय १२ फेब्रुवारीला घेण्यात आला. त्या नुसार २९ पासून सर्व संबंधित कार्यालयांना शनिवार व रविवार हे दोन दिवस सुटी असणार आहे. या कार्यालयात कामकाजाच्या वेळा शिपाई यांच्या साठी सकाळी ९.३० ते ६.३०.अशी आहे . तर अधिकारी व कर्मचारी यांच्या सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशा असणार आहेत.
दि.१ मार्च रविवार व दि २ जिल्ह्यात स्थानिक सुट्टी असल्याने दि. ३ मंगळवार हा कामाचा पहिला दिवस होता . घनसावंगी तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या कार्यालयात भेट दिली असता काही ठिकाणी पहिल्या दिवशी उत्साहात कामाला सुरुवात तर काही ठिकाणी धक्कादायक परिस्थिती दिसून आली .
सकाळी ९.३० पर्यंत सहाय्यक निबंधक कार्यालय उघडलेच नव्हते .
९.४० वा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संदीप मोरे ,कार्यालयीन अधिक्षक एकनाथ भोजने, अव्वल कारकून श्रीधर राऊत, राम चव्हाण , श्रीमती कलकुंदे, लिपिक मयुर देशपांडे, संतोष पेटके , काशीनाथ शेंबडे, अशिष ढळे , जनगणना प्रतिनियुक्तीवर असलेले जी.ए नाईक, राजू निर्मळ , अशोक बडावणे सेवक कचरु खरात , विजयमाला गायकवाड , नेताजी भोजने आदी उपस्थित होते.
सकाळी ९.५३.वा शासकीय जिल्हा ग्रंथालय डिजीटल केंद्र येथे कोणीही अधिकारी कर्मचारी जागेवर नव्हते तर संदीप टोळे हे विद्यार्थी वाचनालयात दिसून आले. सकाळी ९.५९ वा पंचायत समिती कार्यालयात पंचायत विभागात विस्तार अधिकारी एन.पी. नागलवाड , विलास वायचळ आस्थापना , तिथे एक विस्तार अधिकारी जागेवर नव्हते तर एक लिपिक रजेवर असल्याचे सांगितले . पाणीपुरवठा विभागाचे नारायण राठोड उपस्थित होते. बाकी पंचायत समितीच्या विभागात काही दालनांचे कुलूपही उघडण्यात आले नव्हते तर काही विभागात अधिकारी कर्मचारी जागेवर नव्हते .कृषी विभागाचे दालनही बंद होते.
एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागात संदीप खरात कनिष्ठ सहाय्यक उपस्थित होते. येथे कार्यालय प्रमुख यांचेकडे अतिरिक्त कार्यभार असल्याचे समजले. सकाळी १०.१२ गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विकास काळे व शिपाई सिध्दार्थ गायकवाड उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी हे कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी असल्याचे कळाले.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात उपअभियंता डी. आर वागलगावे हे उपस्थित होते .मात्र धक्कादायक बाब अशी की येथे अकरा कर्मचारी असून पैकी दोघांनी रजा दिलेल्या होत्या नऊ कर्मचारीही जागेवर नव्हते .