वाळू माफियांचा कारनामा; जालन्यात २०० ब्रास अवैध वाळूची चोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 07:16 PM2021-02-03T19:16:03+5:302021-02-03T19:17:21+5:30
या अवैध वाळू उत्खननाकडे मंठा महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
तळणी (जि. जालना) : मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून स्थानिक टेम्पोधारकांनी आठवडाभरात रात्रीतून २०० ब्रास अवैध वाळू उत्खनन करत चोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच गावात ठिकठिकाणी ४७ ब्रास अवैध वाळूसाठा आढळून आला. ही बाब उस्वद-तळणी तलाठ्यांच्या पंचनाम्यातून उघड झाली आहे.
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील आठ वाळू घाटांची ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया १५ जानेवारी रोजी पार पडली. त्यानंतर वाळू उपशासाठी ठेवलेले दर हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगळे असल्याने मंठ्याच्या कंत्राटदारांनी या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. यावर न्यायालयीन निर्णय येणार काय, या प्रतीक्षेपूर्वीच पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू झाले आहे. या अवैध वाळू उत्खननाकडे मंठा महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे रात्रीतून वाळूचोरी अन् दिवसा नुसते पंचनामे होणार का, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रात्रीतून वाळू उत्खनन
पूर्णा नदीपात्रातून भुवन, पोखरी केंधळे, वाघाळा, टाकळखोपा, सासखेडा, लिंबखेडा, कानडी, देवठाणा-उस्वद येथील स्थानिक टेम्पोधारक थेट नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करतात.
पंचनामा तहसील कार्यालयाकडे सादर
याबाबत तलाठी नितीन चिंचोले यांनी सांगितले की, पूर्णा नदीपात्रातून स्थानिक टेम्पोधारकांनी २०० ब्रास अवैध वाळू उत्खनन करून चोरी केली, तर गावात ठिकठिकाणी ४७ ब्रास अवैध वाळूसाठा केल्याचे आढळून आल्याचा पंचनामा ३० जानेवारी रोजी तहसीलकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.