फडणवीस-दरेकरांना मराठा आंदोलनात फूट पाडून दंगली घडवायच्यात; जरांगेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:32 PM2024-07-30T16:32:17+5:302024-07-30T16:33:04+5:30

वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता, पण मराठ्यांच आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा डाव आहे.

Fadnavis-Darekar wanted to create riots by dividing the Maratha movement; A serious allegation by Jarang | फडणवीस-दरेकरांना मराठा आंदोलनात फूट पाडून दंगली घडवायच्यात; जरांगेंचा गंभीर आरोप

फडणवीस-दरेकरांना मराठा आंदोलनात फूट पाडून दंगली घडवायच्यात; जरांगेंचा गंभीर आरोप

- पवन पवार 
वडीगोद्री ( जालना) :
आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडायची आहे. मराठ्यात मारामारी लावायच्या आहेत. मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्या आहेत, असा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आज प्रसार माध्यमांसोबत बोलताना केला. 

आज काही मराठा आंदोलकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावर अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. सर्वच पक्षांना जाब विचारला पाहिजे, समाजाचं आंदोलन सुरू असेल तेव्हा विचारला पाहिजे. आता आंदोलन सुरू नाही तर हे कोणाचे अभियान आहे, असा सवाल जरांगे यांनी केला. तसेच कोणी सोबत आलं नाही तरी समाजाची ताकद वाढवणार. विधानभवनात आवाज उठवायला पाहिजे. त्यामुळे आमच्या हक्काचे लोक शंभर टक्के आम्ही विधानसभेत पाठवणार. याबाबत २९ ऑगस्टला निर्णय घेणार, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.

आमदार प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजात फूट पाडण्याच काम केलं. क्रांती मोर्चाला दरेकर यांनी बदनाम करण्याचे काम केलं. एका क्रांती मोर्चाचे तीन तुकडे केले, बैठकीला समाजाला बोलवायचे आणि त्यांना बदनाम करायचं असे, काम दरेकर यांनी केल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. त्यांना फुस लावणारा कोकणातील एक नेता आहे. विधान परिषदेवर आमदारकी समाजात फूट पाडण्यासाठीच मिळते असेही जरांगे म्हणाले.

वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता, पण मराठ्यांच आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा डाव आहे. सध्या कुठेही आंदोलन सुरू नाही. मराठा समाज सर्व नेत्यांना जाब विचारण्यासाठी सक्षम आहे. मात्र, त्यांना शांततेच्या आंदोलनात चुकीचे काही तरी घडवून आणायचे आहे. ७ ऑगस्टच्या रॅलीत ते काही घडवून आणतील, असा आरोप देखील यावेळी जरांगे यांनी केला आहे. 

Web Title: Fadnavis-Darekar wanted to create riots by dividing the Maratha movement; A serious allegation by Jarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.