बनावट पोलिसांनी गुटखा तपासणीचे नाटक केले;गुजरातच्या व्यापाऱ्याचे पावणेदोन लाख पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:36 AM2022-04-12T11:36:06+5:302022-04-12T11:36:36+5:30
पोलीस असल्याचा बनाव करीत तपासले वाहन
अंबड (जि. जालना) : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस असल्याचा बनाव करीत एका वाहनाची तपासणी करीत एक लाख ८० हजार रुपयांची बॅग लंपास केली. ही घटना १० एप्रिल २२ रोजी दुपारच्या सुमारास जालना-अंबड महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडली.
भावनगर (गुजरात) येथील गोपाळ बनोदिया हे रविवारी दुपारी जुने कपडे असलेले वाहन (क्र. व्ही. जे. १३- ए. डब्ल्यू.१३७२) घेऊन जालना-अंबड मार्गावरून जालन्याकडे जात होते. अंबड शहरापासून काही अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी बनोदिया यांचे वाहन थांबविले. आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांना ओळखपत्र दाखविले. तुमच्या वाहनात गुटखा असल्याची माहिती मिळाली आहे, असे सांगत वाहन तपासण्यास सुरुवात केली. एकाने बनोदिया यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करून विविध प्रश्न करीत त्यांना बोलण्यात गुंतविले.
तर दुसऱ्याने वाहन तपासण्याच्या बाहण्याने चालकाच्या सीटमागे ठेवलेली एक लाख ८० हजार रुपयांची बॅग काढून नेली. वाहन तपासून ते दोघे निघून गेल्यानंतर आपल्या वाहनातील बॅग चोरीस गेल्याचे बनोदिया यांच्या लक्षात आले. या प्रकरणात बनोदिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक मतकर करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोनि. नितीन पतंगे यांनी सांगितले.