जालन्यात घातक शस्त्रसाठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:58 PM2019-04-12T23:58:47+5:302019-04-12T23:59:08+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोकुळवाडी मार्गावरील हरिगोविंदनगर येथील एका घरावर छापा मारुन तीन धारदार तलवारी, एक खंजीर, एक गुप्ती, एक कुकरी, एक चाकू, सत्तूर असा मोठा शस्त्राचा साठा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोकुळवाडी मार्गावरील हरिगोविंदनगर येथील एका घरावर छापा मारुन तीन धारदार तलवारी, एक खंजीर, एक गुप्ती, एक कुकरी, एक चाकू, सत्तूर असा मोठा शस्त्राचा साठा जप्त केला. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याची शहरातील पहिलीच घटना आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडाच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना हरीगोविंदनगर येथील अजय श्रीसुंदर (२७) याने अवैधपणे धारदार घातक शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती.
गुन्हे शाखेच्या पथकाने याची पडताळणी केल्यानंतर श्रीसुंदर याच्या घरावर छापा मारला घरात ठिक ठिकाणी लपवून ठेवलेल्या तीन तलवारी, रेम्बो खंजीर, सत्तूर, गुप्ती, अनेक चाकू असा धारदार शस्त्रांचा साठा जप्त करुन श्रीसुंदर याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, सहायक पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जससिंग परदेशी, ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर आदींनी कारवाई यशस्वी केली.
पिस्तूल पकडण्यासाठी गेले अन...
गोविंदनगर येथील अजय श्रीसुंदर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. पिस्तूल पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला घराची झडती घेत असताना शस्त्रांचा इतका मोठा साठा सापडला.
गोपाल शर्मा याच्या हत्येमध्ये आरोपी
पकडलेला अजय श्रीसुंदर याला शहरात २०१२- १३ मध्ये झालेल्या गोपाल शर्मा खून प्रकरणात अजय श्रीसुंदर याला पोलिसांनी अटक केली होती. काही महिने हर्सूल कारागृहात त्याने शिक्षा भोगली आहे. जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे जिल्ह्यासह इतर जिल्हयात काही गुन्हेगारी कृत्य केल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.