पैसे घेतले, इलेक्ट्रिक स्कुटी पाठवली नाही; बनावट वेबसाईट चालवणारा भामटा बिहारमधून ताब्यात
By दिपक ढोले | Published: March 28, 2023 03:04 PM2023-03-28T15:04:35+5:302023-03-28T15:05:32+5:30
'ओला इलेक्ट्रिक स्कुटी' च्या नावे बनावट वेबसाईट; फसवणूक करणारा भामटा बिहारमधून ताब्यात
जालना : ओला इलेक्ट्रिक स्कुटी या नावाने बनावट वेबसाईट तयार करून परतूर येथील एका जणाची एक लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी बिहार राज्यातील नालंदा येथून ताब्यात घेतले. संशयिताकडून सात मोबाईल व रोख रक्कम असा एकण एक लाख 5८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रिंकेशकुमार दिनेश प्रसाद (२५, रा.धरहरा, जि.नालंदा,बिहार) असे ताब्यात घेतलेल्या संशयिातचे नाव आहे.
परतूर येथील संजय शर्मा यांनी ओला इलेक्ट्रिक स्कुटी या वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर फोन करून इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करण्यासंदर्भात संशयित रिंकेशकुमार याच्याशी संपर्क केला होता. संशयिताने फिर्यादीस टप्प्याटप्प्याने एक लाख ४८ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र, ठरलेल्या वेळेत स्कुटी पाठवली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली.
या प्रकरणी सुरुवातीला परतूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, रिंकेशकुमार याचा मोबाईल सुरू असल्याने सायबर पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळविले. जालना सायबर ठाण्याचे एक पथक दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासात नालंदा भागात असल्याने या पथकाने संशयित रिंकेशकुमार यास नालंदा येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, सहायक निरीक्षक एस.बी. कासुळे, कर्मचारी संदीप मांटे, गोरख भवर, इरफान शेख, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे यांनी केली.