कंटेनरसह ५ लाखांच्या गाद्या चोरीची खोटी तक्रार दिल्याचे उघड; फिर्यादीसह तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 06:12 PM2022-04-01T18:12:16+5:302022-04-01T18:14:18+5:30
जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या आनंदगड घाटात ट्रक आडवून मारहाण करीत चोरी केल्याचे खोटी तक्रार दिली
जालना : चौघांनी मारहाण करून टेलरसह २५ लाख रुपयांच्या गाद्यांचा मुद्देमाल चोरून नेल्याची खोटी तक्रार देणाऱ्या फिर्यादीसह तिघांना तालुका जालना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. मोहम्मद अजीम अन्वर (रा.चांदगड, उत्तर प्रदेश), अशोक सदाशिव मिसाळ, गणेश राजाभाऊ मिरगे, विकास संपत मोरे अशी आरोपींची नावे आहेत.
जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या आनंदगड घाटात ट्रक आडवून मारहाण करीत, टेलरसह २५ लाखांच्या गाद्या चोरून नेल्याची तक्रार मोहम्मद अन्वर याने तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथके करून तपास सुरू केला. दरम्यान, तक्रारदार असलेल्या चालकाच्या संशयास्पद हालचाली असल्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. चालकाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने साथीदारांसोबत सदरील गुन्हा केला असून, मालकाला विश्वास वाटावा म्हणून ही फिर्याद दिल्याची कबुली दिली.
त्यानंतर, पोलिसांनी मंठा येथील गोदामात ठेवलेला ५ लाखांचा मुद्देमाल व बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे ठेवलेले टेलर जप्त केले. अन्य तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, संदीप उगले, संदीप बेराड, वसंत धस, रवि मेहत्रे, प्रतापसिंग जारवाल, अशोक राऊत आदींनी केली आहे.