खोटी सही; डॉक्टरला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:58 AM2019-01-17T00:58:08+5:302019-01-17T00:58:16+5:30
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेटमधील जवळपास २७३ कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणात जालन्यातील दीपक हेल्थ अॅन्ड वेलनेस कंपनीचे संचालक तथा डॉ. संजय राख यांना दिलासा मिळाला आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेटमधील जवळपास २७३ कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणात जालन्यातील दीपक हेल्थ अॅन्ड वेलनेस कंपनीचे संचालक तथा डॉ. संजय राख यांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय हस्ताक्षर तज्ज्ञांनी जो अहवाल दिला आहे, त्यात डॉ. राख यांची केवळ ७४ कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणावर खरी स्वाक्षरी असून, नंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने अनुक्रमे २३ कोटी आणि २५० कोटी रूपयांचे कर्ज तीन वेगवेगळ्या
बँकेकडून घेतले होते. ‘त्या’ कर्ज प्रकरणात कारखान्याने संबंधीत बँकेला जी संचालकांची हमी दिली होती. त्या कागदपत्रांवर डॉ. राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आहेत.
डॉ. राख यांचे नातेवाईक असलेले आणि केजीएस शुगर या खासगी साखर कारखान्याचे संचालक दिनकर बोडखे, प्रल्हाद कराड, अनिल मिश्रा, मंजूषा बोडखे, दिवाशीष पारामंडल हे या कारखान्याचे संचालक आहेत. याचवेळी डॉ. संजय राख यांना संचालक करण्याच्या हेतूने त्यांच्याशी चर्चा केली. तसेच केजीएस शुगरचे ६५ लाख रूपयांचे शेअर देऊन राख यांना संचालक म्हणून कारखान्यावर घेतले.
मध्यंतरी कारखाना चांगल्या स्थितीत होता. त्यामुळे कारखान्याने प्रारंभी ७४ कोटी रूपयांचे कर्ज नाशिक येथील कॅनरा बँकेककडून काढले होते. त्या कर्ज प्रस्तावावर मात्र, डॉ. राख यांची खरी स्वाक्षरी होती. नंतरचे कर्ज काढताना डॉ. राख यांना कुठलीच कल्पना न देता त्यांची खोटी स्वाक्षरी कर्ज प्रकरणाच्या कागदपत्रांवर करून ११६ जणांच्या नावावर २३ कोटी आणि नंतर २५० कोटी रूपयांचे कर्ज हे अनुक्रमे कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसिस बँकेतून काढले. हे काढल्यानंतर त्याच्या वसूलीसाठी जालन्यातील रहिवासी असलेले डॉ. संजय राख यांची स्थावर मालमत्ता जप्त का करण्यात येऊ अशी कॅनरासह अन्य बँकांची नोटीस मिळाल्याने डॉ. राख हादरून गेले. त्यांनी लगेचच संबंधित कारखान्याच्या संचालकांविरूध्द रितसर कदीम जालना पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून सदर घटनेचा तपास हा जालन्यातील विशेष आर्थिक तपास शाखेकडे वर्ग केला.
याचा तपास विशेष पोलीस शाखेचे उपविभागीय पोलीस अधीक्षक एस.डी. बांगर यांच्याकडे तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी सोपविला होता.
तक्रारीत म्हटल्यानुसार माझ्या खोट्या सह्या करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज उचलेल्या प्रकरणी बांगर यांनी डॉ. राख यांच्या सहीचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील शासकीय हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविले
होते.
मात्र आठ महिन्यानंतरही हा अहवाल न आल्याने या प्रकरणी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात डॉ. राख यांनी याचिका दाखल करून संबंधित प्रकरणाचा तपास बांगर यांच्याकडून काढून तो सीआयडीकडे वर्ग करावा तसेच हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवालही तातडीने मिळावा असे याचिकेत नमूद केले होते. याचिका दाखल झाल्यावर हस्ताक्षर तज्ज्ञांनी त्यांचा अहवाल तपास अधिकारी बांगर यांच्याकडे दिल्याचे बांगर म्हणाले.
दोन ठिकाणी बनावट सही
यावेळी बांगर यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, की अहवाल मिळाला असून, त्यात डॉक्टरची दोन कर्ज प्रकरणांवर बनावट सही असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी तथा कारखान्याच्या अन्य संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी जालना येथील न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी सुनावणी होऊन न्यायाधीशांना ही सुनावणी पुढे ढकलली असून, त्यावर आता १९ जानेवारीला सुनावणी होणार असल्याचे डॉ. राख यांची बाजू मांडणारे विघिज्ञ अॅड. सुनील किनगावकर यांनी सांगितले.