गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:56 AM2019-03-13T00:56:35+5:302019-03-13T00:57:12+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्याच्या गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्याच्या गर्भवती महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जवखेडा ठोंबरे येथील सरला ज्ञानेश्वर नांगरे ही महिला केदारखेडा येथे २२ जानेवारी रोजी झालेल्या कुटुंब कल्याण शिबिरात तपासणीसाठी आली होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी एक दिवस अगोदर पूर्ण तपासण्या करण्यात आल्या होत्या. यानंतर म्हणजे २२ जानेवारी रोजी सदरील महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु संबंधित महिला दीड महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियापूर्व तपासण्या केल्या होत्या. त्यांनीच सदरील महिला मंगळवारी आरोग्य केंद्रात आली असता त्या महिलेस तुम्ही गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेला धक्का बसला आहे. सदरील महिलेला दोन अपत्ये आहेत. त्यामुळे तिसरे अपत्य नको म्हणून त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हा शल्य चिकीत्सक व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आपणाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय तिसºया अपत्याचा सांभाळ करण्याची चिंता मला सतावत असल्याचे त्यांनी सांगितले.
याविषयी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर लटपटे यांनी सांगितले की, महिलेने मासिक पाळीची वेळ चुकीची सांगितली होती. शिवाय शस्त्रक्रियेपूर्वी चाचणी निगेटिव्ह आल्याने शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविल्याचे लटपटे यांनी सांगितले.