महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी!
By विजय मुंडे | Published: April 27, 2024 07:38 PM2024-04-27T19:38:45+5:302024-04-27T19:39:28+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित.
भोकरदन ( जालना) : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. एकेकाळी दानवे यांचा पराभव केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे अब्दुल सत्तार यांनी शनिवारी राजुरेश्वराच्या साक्षीने रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराचा नारळ फाेडला. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या डोक्यावर टोपी घालत राजकीय मदत करण्याचे जणू वचनच एकमेकांना दिले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री सर्वपचरिचित. मात्र, २०१९ पूर्वी त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले होते. त्यावेळी सत्तार हे काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी त्यांनी दानवे यांचा ''अर्जुना''च्या ''बाणा''ने वध करण्याचा विडा उचलला होता. तेव्हा अर्जुन खोतकर हे भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत होते. तरीही त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांना सोबत घेऊन दौरे केले होते. शिवाय त्यावेळी त्यांनी डोक्यावर टोपी घातली होती व दानवे यांचा पराभव केल्यावरच डोक्यावरील टोपी काढण्याची शपथ घेतली होती.
मात्र, २०१९ च्या निवडणुकीत दानवे यांना पराभूत करू म्हणणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँगेसचा राजीनामा देऊन दानवे यांना एक लाखाचे मताधिक्य दिले होते. त्यानंतर अब्दुल सत्तार हे शिवसेना पक्षात गेले व निवडूनही आले. मात्र, त्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या पक्षाची युती असताना सुध्दा दानवे यांच्यासह भाजपचा कोणताही पदाधिकारी सत्तार यांच्या प्रचारसाठी सहभागी झाला नाही. त्यांनी सर्व ताकद अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्या पाठीमागे उभी केली होती. मात्र, सत्तार यांनी स्वबळावर बाजी मारली होती.
सत्तार यांची भूमिका आणि दानवे कार्यकर्त्यांसह भेटीला
सत्तर यांना शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर शिवसेना फुटली व ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. परत भाजप, शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले. तुम्ही लोकसभेत माझ्याकडून काम करून घेता व विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्ते माझे काम करीत नाही, आता तसे चालणार नाही, अशी भूमिका सत्तार यांनी घेतली. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडच्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना २६ एप्रिल रोजी सत्तार यांच्या कार्यालयात नेले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी राजूर येथे मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी सभापती शिवाजी थोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.