‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नारळ देणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:31 AM2020-01-03T01:31:42+5:302020-01-03T01:32:10+5:30
१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. जालना जिल्ह्यातील जवळपास ५३ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारीत केला आहे. त्याची अंमलबजाणी १ एप्रिल २०१० पासून सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने २३ आॅगस्ट २०१० व २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, सर्व शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या शिक्षकांना ३० मार्च २०१९ अखेरपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. अन्यथा त्यांच्या सेवा समाप्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार २०१३ पासूून टीईटी व सीटीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस बसण्यास शिक्षकांना संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, तरीही काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही. त्यामुळे २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर शहानिशा करून त्यांच्या सेवा समाप्ती बाबतचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेतील अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सेवा संबंधीत शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी, असेही निर्देश आहेत. संस्थांनी या शिक्षकांच्या सेवा यापुढेही सुरू ठेवल्यास १ जानेवारी २०२० पासून त्यांना शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील जवळपास ६० ते ६५ शिक्षकांची नियुक्ती २०१३ नंतर करण्यात आलेली आहे. त्यापैकी ५३ शिक्षकांनी टीईटी दिलेली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यात विनाअनुदानित २५ तर जि.प. शाळेतील २८ शिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांंच्या सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाले असून, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.