समृद्धीवरील इंटरचेंजसाठी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:07 AM2018-04-24T01:07:43+5:302018-04-24T01:07:43+5:30
समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातील गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पांइट (चढ-उतारस्थळ) इतरत्र हलवला जाऊ नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातील गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पांइट (चढ-उतारस्थळ) इतरत्र हलवला जाऊ नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.
सर्व पक्षीय शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर, भाऊसाहेब वाढेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात सहभाग शेतक-यांनी हातात फलक घेवून जोरदार घोषणाबाजी केली. प्रस्तावित इंटरचेंजसाठी उपविभागीय अधिका-यांनी दोन वेळेस अधिसूचना प्रसिध्द केली होती. त्यानुसार जामवाडी शिवारातील १.९७ ,गुंडेवाडी शिवारातील ६५.८०, तांदूळवाडी शिवारातील ६.९८ व जालना शिवारातील ६.७३ हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. शेतक-यांनी शासन दरानुसार जमीन विक्री करण्याची संमती दर्शवली आहे. मात्र, ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी प्रशासनातील अधिकारी, समृध्दी महामागार्तील वरिष्ठ अधिकारी, पुढा-यांना हाताशी धरून निधोना व खादगाव शिवारात इंटरचेंज हलविण्याच्या प्रयत्नात आहे. या भागातील जमीन ९० लाख रुपये एकर दराने खरेदी करावी लागणार आहे. याउलट प्रस्तावित ठिकाणची जमीन ३० ते ४० लाख रुपये दराने शासनाला मिळणार आहे. काही उद्योजकांनी स्वार्थासाठी इंटरचेंज हलविण्याचा घाट घातल्याचा आरोप भाऊसाहेब वाढेकर, नारायण गजर, सुधाकर वाढेकर, शामराव लांडगे, प्रशांत वाढेकर, भरत कापसे यांनी केला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांना देण्यात आले. निवेदनावर बबन गजर, संजय गजर, निवृत्ती कापसे, अर्जुन गजर, दत्ता वाकडे, वैजिनाथ वैद्य, अंकुशराव गायकवाड, मारोती बडदे, शिवाजी गजर, प्रताप वाढेकर, काकासाहेब वाढेकर, रामू ठोंबरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत. तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.