विजेचा शॉक लागून शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू
By दिपक ढोले | Published: September 19, 2023 07:58 PM2023-09-19T19:58:37+5:302023-09-19T19:58:44+5:30
जालना : कपाशीच्या शेतात वखर सुरू असताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव ...
जालना : कपाशीच्या शेतात वखर सुरू असताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. अर्जुन पांडुरंग रायकर (५०) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
अर्जुन रायकर हे मंगळवारी सकाळी शेतातील कपाशीच्या पिकात वखर हाणत होते. त्यांच्या शेतातून विजेची केबल गेलेली आहे. वखर सुरू असताना केबलचा स्पर्श बैलाला झाला. त्यामुळे बैल खाली पडला.
अर्जुन रायकर हे बैल पाहण्यासाठी गेले. त्यांनी बैलाला उठविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही विजेचा शॉक लागला. काही वेळाने त्यांची पत्नी शेतातून घरी आली. ही बाब कळाल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. नातेवाइकांनी तातडीने अर्जुन यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.