तलावात बुडाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:19+5:302021-09-14T04:35:19+5:30
भोकरदन : बैलगाडी अचानक तलावात गेल्याने बुडालेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत एक गायही दगावली. ही ...
भोकरदन : बैलगाडी अचानक तलावात गेल्याने बुडालेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत एक गायही दगावली. ही घटना सोमवारी दुपारी भोकरदन तालुक्यातील रजाळा शिवारात घडली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी तलावात उडी घेऊन बैलगाडीचा कासरा सोडल्याने दोन बैलांचे प्राण बचावले.
राजू पांडुरंग साळवे (वय ४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. रजाळा येथील शेतकरी राजू साळवे हे गायीसह बैलांना पाणी पाजण्यासाठी सोमवारी दुपारी बैलगाडीतून जात होते. गावच्या शिवारातील तलावाजवळ गेल्यानंतर अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली. या घटनेत तलावातील पाण्यात बुडालेल्या राजू साळवे यांचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तलावात धाव घेऊन राजू साळवे यांना तलावातून बाहेर काढले. तसेच बैलगाडीचा कासरा तोडला. त्यामुळे बैल तलावातून बाहेर आले. परंतु, या घटनेत गायीचा मृत्यू झाला. राजू साळवे यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, चार मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.
फोटो