शेतकरी हाच खरा ‘आत्मनिर्भर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:44+5:302021-07-01T04:21:44+5:30
सिंचनाच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्नांची गरज विष्णू वाकडे जालना : उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार अशी म्हण रूढ आहे. भारत हा ...
सिंचनाच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्नांची गरज
विष्णू वाकडे
जालना : उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार अशी म्हण रूढ आहे. भारत हा पूर्वीपासून एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीमध्ये घाम गाळून शेतकरी केवळ स्वत:चेच पोट भरत नाही, तर तो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो.
१ जुलै ही राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांची जयंती, याचदिवशी साजरी केली जाते. राज्यात आणि देशात आज शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जिल्ह्याचा विचार केल्यास, जालना जिल्हा हा बियाणांची पंढरी म्हणून ओळखला जातो. या बियाणांच्या पंढरीला खरी ओळख करून दिली, ती बद्रिनारायण बारवाले यांनी. बदलत्या काळाची गरज ओळखून त्यांनी बीटी बियाणांचा विकास करून कपाशीचे बीटी बियाणे देशात सर्वप्रथम आणले.
त्यामुळे आज कापूस उत्पादनात भारत जगात पहिल्या पाच देशांमध्ये गणला जातो. शेती आणि पाणी हे समीकरण आहे. ही गरज लक्षात घेऊन २५ वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी कडवंची येथे जे पाणलोट क्षेत्र विकसित केले आहे, ते निश्चितच प्रेरणादायी आहे.
कृषी विज्ञान केंद्र, राज्याचा कृषी विभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन मिळत आहे, त्यातून शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढून आर्थिक संपन्नता येण्यास मदत झाली आहे.
नवीन तंत्रज्ञानाची कास धरून शेती गरजेची
बदलत्या काळानुसार पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता शक्य नाही. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन उत्पादन वाढविण्याची गरज आहे. शेतीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आलेले आहेत. गरज आहे ती केवळ शेती कुठल्याही परिस्थितीत टिकवून ठेवून ती सांभाळण्याची.