जिथे संशोधन झाले त्या मातीत पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 08:06 PM2024-08-10T20:06:04+5:302024-08-10T20:06:47+5:30
बदनापूर येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मोसंबी संशोधन केंद्र कार्यरत आहे.
- संतोष सारडा
बदनापूर : बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात तूर, मूग, हरभरा या बियाण्यांच्या विविध जातींचे संशोधन झालेले असून हे बियाणे बदनापूरसह तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात मिळत नसल्यामुळे येथील संशोधनाचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.
बदनापूर येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मोसंबी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या संशोधन केंद्रातील संशोधकांनी अपार मेहनतीने अनेक बियाण्यांच्या जातीचे संशोधन शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढावे याकरिता दिलेले आहे. हे संशोधन राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध झालेले आहेत. याचा उपयोग राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी घेत आहेत. या सर्व संशोधित केलेल्या वाणांच्या बियाण्याचे उत्पादन कृषी विद्यापीठामार्फत केले जाते. उत्पादित केलेले बियाणे परभणी, छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येते. परंतु, बदनापूर येथे संशोधन झालेले हे बियाणे बदनापूर परिसरातील शेतकऱ्यांकरिता विक्री करण्यात येत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना या संशोधित वाणांचा आपल्या शेतात उपयोग घेता येत नाही.
यातील अनेक संशोधित वाण विविध रोगांना बळी पडत नाही तसेच कमी पाण्यात येतात. उत्पन्नही मुबलक मिळते अशा वैशिष्ट्यपूर्ण बियाण्याला मात्र कृषी विद्यापीठाच्या ध्येय धोरणामुळे शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. हे बियाणे या भागातील शेतकऱ्यांना खरिपात मिळाले नसले तरी, रब्बी हंगामात मोती ज्वारी व हरभऱ्यासारखे बियाणे शेतकऱ्यांना पेरणीला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी संशोधित बियाणे या भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
विक्री केंद्र नाही
येथे संशोधित झालेले बियाणे काही खासगी कंपन्या या बियाण्याची जात व वाणाचा नंबर छापून विकतात. परंतु, शेतकऱ्यांचा विश्वास कृषी संशोधन केंद्रावर जास्त असल्यामुळे बरेच शेतकरी येथील बियाण्याची या केंद्रात विचारणा करीत असतात. परंतु, येथे विक्री केंद्र नसल्यामुळे बियाण्यांची विक्री होत नाही.
संशोधित झालेले बियाणे
या सर्व संस्थांना प्रत्येकी शंभर ते दीडशे एकरपर्यंत जमीन दिलेली आहे. यापैकी कृषी संशोधन केंद्रामध्ये तूर बीडीएन १, बीडीएन २, बीडीएन ७०८, बीडीएन ७११, बीडीएन ७१६, बीएसएमआर १७५, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, गोदावरी, रेणुका या तुरीच्या जाती संशोधित केलेल्या आहे. तसेच मुगाच्या बीएम ४, बीएम २००२- १, बीएम २००३- २, वन बीटीएमआर १४५ या मुगाच्या जातीचे संशोधन झालेले आहे. हरभऱ्याचे बीडीजे ९३, बीडीएनजे ७९७, बीडीएनजे ७९८, परभणी १६ या हरभऱ्याच्या जातीचे संशोधन झालेले आहे.