पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:29 AM2019-05-27T00:29:16+5:302019-05-27T00:29:37+5:30

तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत.

Farmers doing pre- cultivation works | पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा मग्न

पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा मग्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीची कामे करताना दिसत असून, कृषी विभागाने यावर्षी साडेपाच लाख हेक्टरवर खरीप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जिल्ह्यात सतत चार वर्षापासून कमी पर्जन्यमान, दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे यातून होरपळलेला शेतकरी कंबर कसून खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, ठिबक संच खरेदीसाठी लगबग चालू आहे.
यावर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाचे बियाणे खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे बँकाही पीककर्ज देत नसल्याने शेतकरी हैराण झाला असून, उसनवारी करुन शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेती मशागतीला लागला आहे.

पारा : तीव्र उन्हाचा कामांना फटका
१ मेपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४१ ते ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला आहे. पारा ४१ ते ४३ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे.
साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापूर्वीपासून बळीराजा खरिपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदी कामे तो करीत असतो. परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत आहेत.

Web Title: Farmers doing pre- cultivation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.