शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठ्याची स्वप्नपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:22 AM2019-06-23T00:22:14+5:302019-06-23T00:22:37+5:30
जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. जिल्ह्यात कृषीपंप कार्यान्वित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने शेतक-यांतून नेहमीच ओरड होत होती. यामुळे शेतक-यांना रात्र जागून काढून पिकांना पाणी द्यावे लागते होते. यामुळे शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे राज्यातील शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून तसेच महावितरणचे संचालक संजीव कुमार यांच्या पुढाकाराने शेतक-यासाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभर भरघोस प्रतिसादही मिळत आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यत २७ हजार शेतक-यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ९ हजार आठ शेतक-यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार २३२ शेतक-यांनी शुल्काचा भरणाही केलेला आहे. २ हजार शेतक-यांची यादी संबंधित कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. १ हजार शेतक-यांचा स्थळ पाहणी अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ७२ शेतकºयाकडे सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी ८ हजार २८० रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २४ हजार ७१० तर अनुसूचित जाती- जमाती गटातील लाभार्थ्यांसाठी १२ हजार ३५५ रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय पारंपरित वीजपुरवठ्यासाठी रक्कमेचा भरणा करुन प्रलंबीत यादीत असलेल्या संबंधित लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. प्रथम पैसे भरणा-यांना प्राधान्य या तत्वावर शेतकºयांना सौर कृषीपंप बसवून देण्यात येत आहे. शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दिवसेदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दगडी कोसळा जाळून वीज निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे.
आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उन्ह तापते सौरपंपामुळे शेतक-यांना दर्जेदार वीज उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकºयांना दिवसाही शेतीपंपास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलापासून मुक्तता सोबतच डिझेलच्या तुलनेत शून्य खर्च असणार आहे.