सिंडीकेट बँकेसमोर शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:04 AM2019-08-06T01:04:08+5:302019-08-06T01:04:44+5:30
सिंडिकेट बँक शाखेकडून कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शविल्याने मासेगाव येथील शेतक-यांनी सोमवारी बँकेसमोर उपोषण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कंडारी, परतूर भागात आहेत. त्यामुळे कुंभार पिंपळगाव येथील सिंडिकेट बँक शाखेकडून कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शविल्याने मासेगाव येथील शेतक-यांनी सोमवारी बँकेसमोर उपोषण केले. तहसीलदार व अग्रणी बँक अधिका-यांनी
मध्यस्थी केल्याने शेतक-यांनी उपोषण मागे घेतले. घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील काही शेतक-यांच्या जमिनी कंडारी (प.) शिवारामध्ये आहेत. गत काळात मासेगाव येथील शेतक-यांना सिंडीकेट बँकेकडून कर्जपुरवठा झालेला आहे. शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतून शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देखील मिळालेला आहे. मात्र काही नवीन शेतकरी पीककर्जापासून वंचित असल्याने या शेतक-यांनी पीककर्जाची मागणी केली. बँकेकडून प्रस्ताव नाकारण्यात आले. त्यामुळे शेतक-यांनी जिल्हा अग्रणी बँकेकडून कर्जपुरवठा देण्याबाबत पत्र आणून दिले. मात्र तरीही शाखेकडून नकार मिळाल्याचा आरोप शेतक-यांनी केला. पीककर्जास बँक नकार देत असल्याने रामेश्वर परमेश्वर आनंदे, गुलाब आनंदे, भरत आनंदे, दत्तात्रय आनंदे, हनुमंत आनंदे, संभाजी आनंदे, तुलसीदास आनंदे, शिवाजी आनंदे, मधुकर आनंदे, कैलास आनंदे या शेतकºयांनी सोमवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.
मात्र, तहसीलदार, अग्रणी बँक अधिका-यांनी मध्यस्थी करून आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पोउपनि सचिन कापुरे यांची उपस्थिती होती. १५ आॅगस्टपर्यंत पीककर्ज न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.