कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:37 AM2019-01-03T00:37:58+5:302019-01-03T00:38:27+5:30
सिंचन विहिरीच्या बिलासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत शेतक-यांचे दुस-या दिवशीही उपोषण सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : सिंचन विहिरीच्या बिलासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत शेतक-यांचे दुस-या दिवशीही उपोषण सुरूच आहे.
परतूर तालुक्यातील शेतक-यांनी पंचायत समितीकडून देण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या रखडलेल्या बिलासाठी तसेच शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, रोहयोची कामे सुरू करण्यासाठी, बोंडअळीचे उर्वरित अनुदान देण्यासाठी, तात्काळ पीककर्ज, पीक विमा, सिंचन विहिरींचे कामे सुरू करणे आदी मागण्या करीत १ जानेवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. सध्या थंडीची लाट आहे. या कडाक्याच्या थंडीत रात्रभर हे उपोषणकर्ते बसून होते. जोपर्यंत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी येत नाहीत व आमचे प्रश्न समजून घेत नाहीत, तोपर्यंत हे लाक्षणिक उपोषण सुरूच राहणार असल्याचा पावित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, या सर्व अडचणी गटविकास अधिकारी यांच्याशी संबंधित आहेत. मात्र गटविकास अधिका-यांनीही या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.
या उपोषणकर्त्यांमध्ये जि. प. सदस्य शिवाजी सवने, सरंपच ओंकार काटे, महादेव सोळंके, संदीप तौर, उपोषण कर्त्याची भेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी भेट देऊन विचारपूस केली.