ज्वारीवरील लष्करी अळीने शेतकरी झाले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:17 AM2019-12-03T01:17:02+5:302019-12-03T01:17:22+5:30
मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदाचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकटाचे ठरले. खरिप हंगामात पाऊस नसल्याने उत्पादन घटले असून, नंतर हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शासनाकडून हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते. अनेक शेतकऱ्यांनी याची काळजी घेतली. परंतु मोठ्या प्रमाणावर हा हल्ला झाल्याने ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप आणि रबी हंगामातही पाहिजे तेवढे उत्पन्न मिळणार नसल्याचे वास्तव आहे. यामुळे शेतक-यांची दुहेरी कोंडी झाली आहे. यंदा सोयाबीनचा दर्जाही घटल्याने भाव पाहिजे तेवढा मिळत नसल्याने मिळेल त्या दराने शेतकरी सोयाबीन विक्री करत आहे. काही मोजक्या शेतक-यांकडे आता सोयाबीन शिल्लक असून, ज्यांच्याकडे दर्जेदार सोयाबीन आहे, अशा शेतकºयांना तीन हजार ४०० ते तीन हजार ७०० रूपयांचा दर मिळत आहे.
जालना जिल्ह्यात सीसीआयने चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रावर आता कपाशीची चांगली आवक आली असल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, अद्याप शेतात मोठ्या प्रमाणावर कापूस वेचणीअभावी पडून आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद तसेच खासगी संस्थांमधील विद्यार्थी हे शाळेत येण्याऐवजी थेट शेतात जाऊन कापूस वेचत असल्याने शाळेच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
४१८ कोटीची गरज
जालना जिल्ह्यातील परतीच्या पावसाने जवळपास चार लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना जुन्या निकषानुसार जरी मदत द्यायची असली तरी त्याची रक्कम ही जवळपास ४१८ कोटी रूपये होते. या पैकी पहिला हप्ता म्हणून केवळ ११० कोटी रूपयेच मिळाले असून, उर्वरित रक्कम कधी मिळेल, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.