अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 03:49 PM2020-11-06T15:49:01+5:302020-11-06T15:51:45+5:30

अपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात.

Farmers ignorant of accident insurance; In three years, only 141 farmers in Jalna benefited from the scheme | अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

Next
ठळक मुद्देविविध कारणांमुळे ३९ प्रस्ताव बाद 

जालना : शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आहेत; परंतु अनेक योजना जिल्हा व तालुका पातळीवरील उदासीन प्रशासकीय यंत्रणेमुळे खितपत पडलेल्या आहेत. याचाच प्रत्यय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत आला आहे. या योजनेविषयी ग्रामीण भागात फारशी जनजागृती नसल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात केवळ १४१ जणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर कागदपत्रांअभावी ३९ प्रस्ताव बाद करण्यात आले आहेत. 

शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा अपघाती घटनांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक मदत केली जात आहे. यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेविषयी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये फारशी माहिती नाही. तसेच योजनेसाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यात मोठा कालावधी लागतो. त्यामुळे सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी प्रस्ताव पाठवीत नाहीत. 

१ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान ७५ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. यात ५१ जणांना लाभ मिळाला असून, २३ जणांच्या प्रस्तावात कागदपत्रांच्या त्रुटी सांगून नाकारण्यात आले आहे. ८ डिसेंबर २०१७ ते ७ डिसेंबर २०१८ या वर्षभरात १०५ जणांपैकी ६४ जणांना लाभ तर १५ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तर ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. ८ डिसेंबर २०१८ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ११८ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. पैकी २६ जणांना लाभ, तर ५२ प्रस्ताव प्रलंबित तर ३९ प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. चालू वर्षात आलेले ५० प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जनजागृतीबाबत कृषी विभागाचे दुर्लक्ष
अपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. तर अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये मिळतात. मागील दीड वर्षापूर्वी घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी कुटुंबातील कृष्णा दत्ता बिडवे (२०) याचा काळेगाव येथे अपघात झाला होता. यात कृष्णाचा मृत्यू झाला; परंतु आम्हाला  गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला सदरील योजनेसाठी प्रस्ताव पाठविता आला नसल्याची माहिती मयत कृष्णाचा लहान भाऊ प्रशांत बिडवे याने दिली.

Web Title: Farmers ignorant of accident insurance; In three years, only 141 farmers in Jalna benefited from the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.