जालन्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ ठरली वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 07:20 PM2019-04-21T19:20:29+5:302019-04-21T19:22:19+5:30
वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल
- संजय देशमुख
जालना : पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि दरवर्षी होणारा अत्यल्प पाऊस यात कोणती पिके घ्यावीत हा शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर जालीम उपाय सापडला असून, अत्यंत कमी पाण्यावर फुलणारी रेशीम शेती अर्थात तुतीची लागवड त्यांच्यासाठी संजीवनी ठरली आहे. पूर्वी रेशीम कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत असे. आता जालन्यातच ही बाजारपेठ सुरू झाली आहे. जालन्यातील या बाजारपेठेत गेल्या वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे.
कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. यासाठी जालन्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच सरकारच्या रेशीम विकास विभागाने भगीरथ प्रयत्न केले. त्याचे चांगले परिणाम आज दहा वर्षांनंतर दिसून येत आहेत. महाराष्ट्रात रेशीम कोषाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत २२८० मेट्रीक टनांवरून थेट साडेतीन हजार मेट्रीक टनापर्यंत वाढले आहे. एकीकडे सर्व पिकांची उत्पादकता घसरत असतांना रेशीम शेती मात्र, शेतकऱ्यांना हक्काचा आर्थिक स्रोत निर्माण करून देत आहे.
जालन्यात बाजार समितीने वर्षभरापूर्वी २१ एप्रिल रोजी प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ सुरू केली. या वर्षभरात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे. जालन्यात कायमस्वरूपी रेशीमकोष खरेदीसाठी ६ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.
औरंगाबादेतही होणार केंद्र
जालन्याप्रमाणेच औरंगाबादेतही २५ एकर जागेत अंडीपुंज निर्मिती केंद्र स्थापनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी २७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आचारसंहिता संपताच त्याला मंजूरी मिळेल, अशी माहिती रेशीम उपसंचालक दिलीप हाके यांनी दिली.
धागा निर्मिती केंद्रही सुरू
रेशीम कोषापासून धागा निर्मिती केंद्रही जालन्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. म्हणजेच कच्चा माल उत्पादन केल्यावर तो खरेदी करण्यासाठी जालन्यात हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे.