शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन तर मदत सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:36 AM2019-02-17T00:36:45+5:302019-02-17T00:37:01+5:30
शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, बहुभूधारक अशाप्रकारची नावासहित अद्यावत माहिती संकलित करून तातडीने संबंधित कार्यालयास सादर करायची असल्याने शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन, तर मदत सलाईनवर असल्याचे पाहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, बहुभूधारक अशाप्रकारची नावासहित अद्यावत माहिती संकलित करून तातडीने संबंधित कार्यालयास सादर करायची असल्याने शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन, तर मदत सलाईनवर असल्याचे चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी फेब्रुवारी महिन्यातील दुस-या आठवड्यापासून सदरील माहिती संकलित करण्याच्या सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना वरिष्ठांकडून मिळालेल्या आहेत. अवघ्या दहा ते बारा दिवसांत हे काम संपवायचे असल्याने तसेच शासनस्तरावरून नवीन सूचना येत असल्याने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. तसे पाहता दोन ते तीन वर्षापासून शेतक-यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. परंतू, बहुतांश लाभार्थी शेतक-यांनी बँकेकडे खेटे मारावे लागतात. ते आयएफएससी कोड तसेच खाते क्रमांक चुकल्यामुळे या चुका वारंवार होत असल्याने शेतकरी सातत्याने आधार क्रमांक आणि बँक पासबुक सत्यप्रती महसूल तसेच कृषी विभागाकडे जमा करत आहे.
यावर्षी सुरूवातीपासून जेमतेम पाऊस पडला. खरीप हंगाम कसाबसा आला, रबी हंगाम हातचा गेला. मात्र, अद्यापही कसलीही ठोस आर्थिक मदत शेतक-यांना मिळाली नसल्याचे वडीवाडी येथील सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे तसेच खणेपुरी येथील प्रगतशील शेतकरी सोपानराव बाबर यांनी सांगितले.
यामुळे शेतकरी फक्त आॅफलाईनवर असून त्याला मिळणारी मदत मात्र, सलाईनवर असल्याचे जाणवते.