पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:06 AM2018-05-23T01:06:12+5:302018-05-23T01:06:12+5:30
बाबासाहेब म्हस्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आहे.आतापर्यंत केवळ तीन टक्के पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांना येत्या खरीप आणि रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपये कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या असून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार आहे. या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे ते नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत कृषी पतपुरवठ्याच्या रकमेमध्ये तब्बल ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६२ शाखांसह राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकामधून प्रत्यक्ष कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. खरीप हंगात तोंडावर आल्यामुळे बी-बियाणे, खते व अन्य साहित्य खरेदीसाठी पैशाची गरज असल्यामुळे शेतकरी बँकेत गर्दी करत आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, बँकेच्या आॅनलाइन कामकाज प्रणालीमध्ये येणारा व्यत्यय यामुळे पीककर्ज वाटप संथ गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर पीककर्जासाठी आवश्यक सातबारा, एकूण जमिनीचा दाखला, फेरफार नक्कल, जमिनीच्या चतु:सीमा, मूल्यांकन इ. कागदपत्रे गोळा करताना शेतक-यांची दमछाक होत आहे. अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक येत नसल्याने शेतक-यांना कागदपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. ग्रामीण भागात आपले सरकार पोर्टलवरील सातबारा मिळविताना अडचणी येत आहेत. राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँक मिळून १७ मे पर्यंत ४५ कोटींच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, बँकेने ११ हजार शेतकºयांना २३ कोटी ९२ लाखांच्या पीकर्जाचे वाटप केले आहे. शेतक-यांची अडचण लक्षात घेता पीककर्ज वाटपाचे काम बँकांनी प्राधान्याने करण्याची गरज आहे.
बँकांना सूचना : यंदा पात्र शेतकरी वाढले
कर्जमाफी मिळाल्यामुळे यंदा सुमारे ९५ हजार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. सर्व बँकांना कृषी कर्जाचे प्राधान्याने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ४५ कोटींचे पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर यांनी सांगितले.