शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पाठविला किलोभर कापूस; आयात-निर्यात धोरणाचा अनोखा निषेध
By दिपक ढोले | Published: May 26, 2023 06:51 PM2023-05-26T18:51:25+5:302023-05-26T18:53:12+5:30
शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले.
जालना : केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मरावे की जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सरकार कापसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात असमर्थ झाल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चक्क एक किलो कापूस शुक्रवारी पाठविला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहनत करून कापूस, सोयाबीन, कांदा आदी पिके मोठ्या प्रमाणात पिकवली. ज्यावेळेस ही पीक निघाले; त्यावेळेस सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा मोठा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले. परंतु, पिकांच्या भावात वाढ झाली नाही.
केंद्र सरकारने चुकीचे धोरण आखत कापसाच्या गाठी आणि तेलाची आयात केल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ ओढवली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा निषेध केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक किलो कापूस भेट म्हणून पाठवला आहे. यावेळी दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, रामेश्वर गव्हाळे, सुरेश पवार, पांडुरंग भोसले, अंकुश लकडे, भरत लकडे, दत्तात्रय लकडे, अशोक आटोळे आदींची उपस्थिती होती.