शेतजमिनीचा पोत बिघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:27 AM2019-05-05T00:27:08+5:302019-05-05T00:27:39+5:30
बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्याने दिवसे - दिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीपरीक्षण करून घेतले यात स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनुष्याच्या आरोग्या प्रमाणेच जमिनिचे आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्य बिघडले की लगेच आपण डॉक्टरकडे जातो. तसेच जमिनीचेही आहे. भरघोस उत्पन्न घेण्याचा नादात अनेकजण जमिनीला उसंतच देत नाही. एक पीक काढले की लगेच दुसरे पीक काढायचे त्यात भर म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा मारा, यामुळे जिल्ह्यातील शेतीचा पोत बिघडला आहे. काही वर्ष शेतकºयांना उत्पन्न मिळत मात्र यात शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बिघडलेले पर्यावरण, कमी पर्जन्यमान तसेच रासायनिक खताचा वापर यामुळे जिल्ह्यातील शेतीचे आरोग्य बिघडले आहे. शेतक-यांच्या जमिनीचे मातीपरीक्षण शेतीचे आरोग्य सुधारावे यातून शेतक-यांना भरघोस उत्पन्न घेता यावे म्हणून शासनाने २०१५ पासून मातीपरीक्षणाची विशेष मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या सव्वापाच लाखांच्या आसपास आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने दोन वर्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तब्बल ३ लाख ४३ हजार शेतक-यांनी माती नमुन्याची तपासणी केली आहे. यात निर्देशक क्षारता, आॅरगॅनीक आर्यन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे, लोह, जस्त, मॅगनीज, बॉरोन, जमिनीतील ओलावा अशा विविध बारा घटकांची तपासणी करण्यात आली. यात स्फुरद, नत्र, आणि जस्त आदी मुलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मृद चाचणी विभागाकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतक-यामध्ये जनजागृती करण्यात आली. २०१७ मध्ये ७० हजार शेतक-यांनी माती परीक्षण केले होते. यात वाढ होऊन तब्बल साडेतीन लाख शेतक-यांनी माती परीक्षण केले.
सुपीकता घसरण्याची कारणे
एकापाठोपाठ सलग पीक घेत राहणे, जमिनी पाणथळ, उथळ फार खोल असणे, सतत एकच पीक घेत राहणे, पूर्व मशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे न करणे, क्षारयुक्त अथवा खा-या पाण्याचा पाण्याचा वापर करणे, सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा समतोल वापर थांबविणे, शेणखताचा वापर नसणे आदी कारणामुळे जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे.
जमिनीच्या सुपीकेतेसाठी प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मातीचेपरीक्षण हे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मातीपरीक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मातीचा नमुना कसा घ्यावा
मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग जमिनीचा खडकाळपणा, उंच सखलपणा, पिकांतील फरक व बागायत / जिरायत स्थिती लक्षात घेऊन शेतीच्या वेगवेगळ्या भागातून माती नमुने घ्यावेत.