शेतकऱ्यांनी वेळेवर ऑनलाइन नोंद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:11+5:302021-09-25T04:32:11+5:30
भोकरदन : शासनाने आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी करून ऑनलाइन नोंदणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ...
भोकरदन : शासनाने आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी करून ऑनलाइन नोंदणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले.
तालुक्यातील मालखेडा व सोयगाव देवी शिवारात शुक्रवारी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नोंदणी करण्यासाठी संदर्भात ई-पीक पाहणी ॲप काढले आहे. त्यावर ऑनलाइन नोंदणी करावी. यासाठी प्रत्येक गावात तलाठ्यांना पाठविण्यात आले असून, ते आपल्या पिकाची ऑनलाइन नोंदणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे चोरमारे यांनी सांगितले. ऑनलाइन पीक नोंदणीचे शेतकऱ्यांना अनेक फायदे आहेत. त्यामध्ये पीककर्ज घेताना पीकपेरा आवश्यक आहे. पीक विमा काढण्यासाठी या ऑनलाइन नोंदी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे काही नैसर्गिक आपत्ती आली तेव्हासुध्दा या ऑनलाइन नोंदीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात कोणते पीक लागवड केले आहे त्याचा फोटो काढून तो ऑनलाइन करावा लागणार आहे. जेणेकरून शेतात एक पीक व सातबाऱ्यावर दुसरे पीक अशी चूक यापुढे होणार नाही असे सोरमारे यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार एन.वाय. दांडगे, मंडळ अधिकारी पी.जी. काळे, आर.एम. वाघ, भिका राऊत यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
२० हजार जणांच्या नोंदी
भोकरदन तालुक्यातील १ लाख १७ हजार १५७ शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-पीक पाहणी करून नोंदणी करावी लागणार आहे. २४ सप्टेंबरपर्यंत केवळ २० हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांनी ऑनलाइन ई-पीक पाहणी करून आपल्या नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-पीक पाहणी करून नोंदणी करण्यासाठी इंटरनेटची अडचण येत आहे. तर कधी साईड ओपन राहत नाही. बहुतांश शेतकऱ्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे अडचणी वाढत आहेत.
फोटो ओळी : सोयगाव देवी शिवारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे. यावेळी नायब तहसीलदार एन.वाय. दांडगे, मंडळाधिकारी पी.जी. काळे व इतर.