फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:24 AM2019-05-06T00:24:27+5:302019-05-06T00:24:32+5:30
वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.
परतूर : वाढत्या उन्हात व पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, अहोरात्र जागरण करून झाडांना पाणी देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.
परतूर तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मोसंबी, पेरू, सीताफळ, केळी आदींचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात यावर्षी विहिरी व बोअरनी तळ गाठला आहे. काही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. विकतचे पाणी घेऊन शेतकरी फळबागा जोपासण्याचे काम करत आहेत. विजेच्या भारनियमनामुळे शेतक-यांना वीज व पाण्याचे नियोजन करून अहोरात्र जागरण करत या बागा जगवाव्या लागत आहेत. या फळबागा जगवण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्वी फळबागासाठी शासन अनुदान द्यायचे, मात्र मागील काही वर्षांपासून शेतक-यांना काहीच देण्यात आले नसल्याचे बागायतदार शेतकरी सांगत आहेत. अनुदान देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.