कपाशीच्या बियाणांचा तुटवडयाने शेतकरी त्रस्त; जिथे उपलब्ध तिथे अधिक भावात विक्री

By महेश गायकवाड  | Published: June 5, 2023 04:55 PM2023-06-05T16:55:20+5:302023-06-05T16:56:30+5:30

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

Farmers suffering from shortage of cotton seeds; Selling at higher prices where available | कपाशीच्या बियाणांचा तुटवडयाने शेतकरी त्रस्त; जिथे उपलब्ध तिथे अधिक भावात विक्री

कपाशीच्या बियाणांचा तुटवडयाने शेतकरी त्रस्त; जिथे उपलब्ध तिथे अधिक भावात विक्री

googlenewsNext

भोकरदन : खरीप हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरातील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे; परंतु कृषी सेवा केंद्रांना बियाणे उत्पादक कंपन्याच्या डीलर्सनी मागणी केलेल्या बियाणांचा पूर्ण क्षमतेनेे पुरवठा न केल्याने विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दुकानदार उपलब्ध बियाणांची चढ्या दराने विक्री करत असून, ८५३ रुपयांची बॅग दीड ते तीन हजारांपर्यंत विक्री करत आहेत.

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वच बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यापाऱ्यांना बुकिंग केलेल्या बियाणांपैकी केवळ २० टक्के बियाणांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच संपूर्ण बियाणांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने कपाशीच्या बॅगच्या किमत ८५३ रुपये ठरवली आहे; परंतु काही निवडक खासगी कंपन्यांच्या वाणाला शेतकरी पसंती देत असल्याने या कंपन्यांच्या बॅगचे भाव दुकानदारांनी वाढवले आहेत. एका बॅगमागे दीड ते दोन हजार रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कृषी मार्केटमध्ये कबड्डी, संकेत, पंगा, ब्रम्हा, नवनीत, राशी या वाणांची अधिक मागणी होत आहे.

बियाणे उपलब्ध नाही 
कपाशीचे बियाणे घेण्यासाठी दुकानावर गेलो असताना हव्या असलेल्या बियाणासोबत इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाही.
- कैलास सुसर, शेतकरी, भोकरदन

भाव अधिक आहेत 
सगळ्याच दुकानात कपाशीच्या बियाणाचे दुप्पट भाव सांगत आहेत, तर काही ठिकाणी बियाणे शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहेत. कपाशीचे संकेत हे वाण तर मिळेनासे झाले आहे. मिळालेच तर एक बँगसाठी तीर हजार रुपये मोजावे लागत आहे.
- जुमान चाऊस, शेतकरी धावडा

तत्काळ तक्रार करा 
व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात उपलब्ध असलेल्या बियाण्याचा फलक बाहेर लावणे आवश्यक आहे. जर फलक लावला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय शेतकऱ्यांनी जागृत होणे अपेक्षित आहे. व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे पाकीट विक्री करीत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.
- रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन

Web Title: Farmers suffering from shortage of cotton seeds; Selling at higher prices where available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.