यूट्युबवरून शेतकऱ्याने घेतली प्रेरणा; मराठवाड्यात माळरानावर बहरली सफरचंदाची बाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:17 PM2023-05-23T14:17:55+5:302023-05-23T14:19:03+5:30
आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग; चार लाख रूपये उत्पन्नाची आशा शेतकऱ्यास आहे
- बाळकृष्ण रासने
हसनाबाद ( जालना) : जिद्द, चिकाटी आणि शेतीला आधुनिकतेची जोड दिली, तर अपेक्षित उत्पन्न घेता येते, याची प्रचिती हसनाबाद येथील प्रगतिशील शेतकरी मनोज बद्रीनारायण लाठी यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. मनोज लाठी यांनी दोन एकरांत सफरचंदाची बाग फुलविली असून, पहिल्या बहरामध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यंदाही ही बाग बहरली असून, उत्पन्न दुप्पट होण्याची आशा त्यांना आहे.
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत, शेतात विविध प्रयोग केले आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक मनोज लाठी हे आहेत. लाठी यांनी दोन एकर पडीक जमिनीवर ४०० सफरचंदांच्या कलमा २०१९ मध्ये लावल्या होत्या. योग्य व्यवस्थापनामुळे २०२२ मध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न या सफरचंदाच्या शेतीपासून मिळाले. सफरचंदाची लागवड केल्यानंतर त्यांनी ठिबकचा वापर केला. कोणतीही रासायनिक खते न वापरता गांडूळ खत, गोबर गॅस सॅलरी, शेणखत, चुना, जीवामृत इत्यादींचा वापर केला. त्यामुळे रोगराई कमी प्रमाणात आली. त्यावरही फवारणी करून बाग जोपासली आहे. यंदाही त्यांची सफरचंदाची बाग फुलोऱ्याने फुलली असून, फळे जुलैमध्ये विक्रीस येतील. त्यातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवनवीन उपक्रम राबविणारे मनोज लाठी यांच्या शेतात जांभूळ, खजूर, नारळाची झाडे, केसर आंबा, सीताफळ, डाळिंब अशा सर्वच प्रकारची मिश्र फळबाग असून, त्यांचे हे प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी येतात. या कामी तालुका कृषी अधिकारी भुतेकर, मंडळ अधिकारी इंगळे, कृषी साहाय्य गजानन दळवी व इतरांचे सहकार्य लाभल्याचे सुरेश लाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यूट्युबवरून घेतली प्रेरणा
सफरचंदाची लागवड करण्याची प्रेरणा त्यांना यूट्युबवरून मिळाली. त्यांच्यासह त्यांच्या शेतकरी मित्रांना विश्वासच नव्हता की, सफरचंदाची झाडे आपल्याकडे येऊ शकतात, परंतु त्यांनी अशा कडक, उष्ण वातावरणात मिश्र वातावरणात अण्णा आणि हरिमन या वाणाची सफरचंदाची झाडे लावली व योग्य व्यवस्थापन करून, त्यातून उत्पन्नही मिळविले आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळते
शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून, योग्य व्यवस्थापनाद्वारे शेती केली, तर चांगले उत्पन्न मिळते. शेतीसाठी असलेल्या शासकीय योजनांचाही लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करावे. त्यासाठी कृषी विभागाचेही मार्गदर्शन मिळते.
-मनोज लाठी, प्रयोगशील शेतकरी.