बळीराजा मानसिक दडपणाखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:02 AM2017-12-26T01:02:34+5:302017-12-26T01:02:43+5:30
शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवेअंतर्गत शेतकरी कुटुंबियांचे समुपदेशन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवेअंतर्गत शेतकरी कुटुंबियांचे समुपदेशन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पातून दोन वर्षात अडीच हजार शेतक-यांचे समुपदेशन करण्यात आले असून, अनेक शेतकरी मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे समोर आले आहे.
मागील काही वर्षांत विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, पिकांना न मिळणारा भाव, मुलींच्या लग्नांची चिंता यामुळे शेतकरी मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. अशा स्थितीत शेतक-यांना मानसिक बळ देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. याकरिता गत दोन वर्षांपासून शासनाने १४ जिल्ह्यांत प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पात मानसोपचार तज्ज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रत्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, परिचारिका, कम्युनिटी नर्स यांचा समावेश आहे.
मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातून दोनदा बाह्यरुग्ण विभागात येणाºयांची तपासणी करून समुपदेशनासह उपचार करत आहेत. दोन वर्षात बाह्यरुग्ण विभागात १५ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली असून, पैकी एक हजार ६२४ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच मानसिक दडपणाखाली असणाºया १ हजार ९६७ शेतकºयांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी, गावात कार्यरत आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देऊन गावोगावी जाऊन शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करत आहेत. समुपदेशानामुळे अनेक कुटुंबीयांना फायदा झाला आहे.
औषधोपचाराची गरज असणा-यांना विविध आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे.