पीककर्जासाठी शेतकरी दिवसभर ताटकळत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:32 AM2018-06-08T00:32:59+5:302018-06-08T00:32:59+5:30
खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत.
मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बँकांनी पीककर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला. शिवाय दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले नाही. जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाखांवर शेतक-यांचे ५९४ कोटींचे कर्जमाफ झाले आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत ९५ हजार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरल्याने यंदा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ५५ कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. जिल्हामध्यवर्ती बँकांच्या ६२ शाखांसह ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बँकांमधून सध्या पीककर्जाचे वाटपाला सुरुवात झाली आहे. मात्र, बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, नियोजनाचा अभाव, तांत्रिक अडचणींमुळे पीककर्जाच्या संचिकांचा ढीग वाढतच आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दिवसभरात केवळ चार ते पाच शेतक-यांची कर्जप्रकरणे निकाली काढली जात आहेत. बँक अधिकारी शेतक-यांमध्ये वाद होत आहेत. ग्रामीण भागातून येणा-या दोनशे ते अडीचशे शेतक-यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही बँकांनी दत्तक गावांसाठी विशिष्ट वार ठरवून दिले आहेत. आपला वार असलेल्या दिवशी गावातील बहुतांश शेतकरी दिवसभर बँकेत बसलेले दिसत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हामध्यवर्ती बँकांच्या शाखांसमोर शेतकºयांच्या रांगाच-रांगा पहावयास मिळत आहे. खरिपाची कामे तोंडावर असताना आठवडाभर चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
ृ९० कोटींचे वाटप
जिल्ह्याला खरीप हंगामासाठी १२३२ कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्ट आहे. सर्व बॅकांनी पीककर्जाच वाटपाला प्राधान्य देऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आ्ल्या आहेत. असे असेल तरी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही शाखांमध्ये अद्याप पीककर्ज वाटपास सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत सुमारे ९० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. उद्दिष्ट्याच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.