जनुकीय तंत्रज्ञान वापरण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे : मायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:48+5:302021-03-04T04:57:48+5:30
डॉ. मायी म्हणाले की, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटीपर्यंत होऊ शकते. या वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी जनुकीय पिकांशिवाय पर्याय ...
डॉ. मायी म्हणाले की, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटीपर्यंत होऊ शकते. या वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी जनुकीय पिकांशिवाय पर्याय नाही. सध्या जगामध्ये सर्व प्रकारची फळे, भाजीपाला व अन्नधान्य पिकांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार उत्पादन घेतले जात आहे. भारतामध्ये कापूस पिकांपर्यंतच मर्यादित राहिला असून, वांगी, भेंडी, बटाटा, तांदूळ, मका, मोहरी, केळी यांसारख्या पिकांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानास विरोध होत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण भरघोस उत्पन्न घ्यावयाचे असल्यास जनुकीय तंत्रज्ञानास शासनाने परवानगी द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. कृषिरत्न विजय अण्णा बोराडे म्हणाले की, शेतकऱ्याला जागतिक स्पर्धेत टिकायचे असल्यास शाश्वत उत्पादनासाठी शास्त्रोक्त पातळीवर जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे कमप्राप्त आहे. विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ. मायी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे त्यांनी कौतुक केले.
स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आणि गटांसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प ही एक संधी आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. हा प्रकल्प विशेषकरून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी असून, एकत्रितपणे शेतमाल विक्रीची व्यवस्था करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास या प्रकल्पात वाव आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. कीटकशास्त्र अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले. मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी आभार मानले.