शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:59 AM2019-09-04T00:59:34+5:302019-09-04T00:59:59+5:30
कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकट्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चित्र गंभीर स्वरूपाचे असून, या बँकेच्या ठेवी तीन महिन्यात ३७५ कोटी रूपयांवरून थेट २७४ कोटींवर येऊन ठेपल्या आहेत.
गेल्या चार वर्षापासून जालना जिल्हा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे, याचा परिणाम एकूणच जिल्ह्यातील शेतीचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. उत्पादन घटल्याने शेतक-यांच्या हातात खेळणारा पैसा झपाट्याने कमी झाला आहे. या ठेवी मोडण्याची वेळ शेतकºयांवर का आली, याची विचारणा बँकेत केली असता, अनेकांनी आपल्या मुलींचा विवाह तसेच शेतीच्या कामासाठी ठेवी मोडल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा बँकेतून शंभर कोटीच्या ठेवी मोडल्याचे समोर आले असले तरी, जिल्ह्यातील अन्य सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकेतूनही अनेक शेतक-यांनी त्यांच्या संचित निधीला धक्का लावल्याचे सांगण्यात आले.
एकूण जालना जिल्ह्यातून जवळपास ५०० कोटी पेक्षा अधिक ठेवी विविध बँकांतून शेतकºयांनी काढल्या असाव्यात असा अंदाज बँक अधिका-यांनी वर्तविला आहे.
ठेवी ठेवतांनाच शेतक-यांना पैशांची जमवाजमव करावी लागते. त्यातच त्या ठेवी या दूरवरचा विचार करून ठेवल्या जातात. एकीकडे ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असतानाच पीककर्ज मिळत नसल्याने देखील ठेवी मोडल्याचे शेतक-यांनी नमूद केले. एकूणच अनेक शेतक-यांनी आपल्या ठेवी कायम ठेवत खाजगी सावकारांच्या दारात जाऊन पेरणीसह अन्य कामांसाठी कर्ज काढल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या ही ११० एवढी असल्याचे सांगण्यात आले.
आम्ही आशावादी आहोत
आज जरी शेतक-याने त्यांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर मोडल्या आहेत, हे वास्तव आहे. परंतु शेतक-यांला चांगले उत्पादन झाल्यास तो थोडी-थोडी बचत करून पुन्हा ठेवी जमा करेल असा आमचा अनुभव आणि विश्वास आहे. परंतु यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठेवी मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असा आपला अंदाज आहे. - आशुतोष देशमुख,
व्यवस्थापकीय संचालक, मध्यवती बँक