युवकाची गांधीगिरी ! कर्ज मंजूर न झाल्याने महाराष्ट्र बँकेसमोर शेळ्यांसह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 07:10 PM2020-12-08T19:10:34+5:302020-12-08T19:12:30+5:30
जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथील तरुण शेतकरी गोपाल राजेंद्र गायके हा शेळीपालन व्यवसाय करतो.
टेंभुर्णी (जि. जालना) : शेळी पालनासाठी कर्जाची फाईल दाखल करून ११ महिन्यांचा कालावधी लोटला तरी कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने सोमवारी आपल्या शेळ्यांसह महाराष्ट्र बँकेच्या टेंभुर्णी शाखेसमोर उपोषण सुरू केले. लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथील तरुण शेतकरी गोपाल राजेंद्र गायके हा शेळीपालन व्यवसाय करतो. हा व्यवसाय वाढविण्यासाठी गोपाल गायके याने ११ महिन्यांपूर्वी टेंभुर्णी येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत कर्जाची फाईल दाखल केली होती. वेळोवेळी बँकेत चकरा मारूनही कर्ज मंजूर होत नसल्याने गायके याने बँकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यानुसार गोपाल गायके याने सोमवारी चक्क आपल्या शेळ्या घेऊन टेंभुर्णी येथील महाराष्ट्र बँकेची शाखा गाठली. बँकेसमोर शेळ्या बांधून त्याने उपोषण सुरू केले. बँकेसमोर शेळ्या बांधून उपोषण करण्यात येत असल्याने बँक प्रशासनाचेही धाबे दणाणले होते.
कर्ज प्रकरणातील त्रुटींमुळे कर्ज फाईल वरिष्ठांनी नामंजूर केल्यामुळे उपोषण करू नये, असे बँकेकडून सांगण्यात आले. मात्र, ११ महिने बँकेत खेटे मारून त्रस्त झालेल्या गायके याने कोणत्याही परिस्थितीत उपोषण करणारच, अशी भूमिका घेतली होती. अकोलादेव सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित, शेतकरी संघटनेचे नागोराव कापसे, चेअरमन रावसाहेब अंभोरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे गजानन बंगाळे, नसीम शेख, प्रताप नवले यांनी पुढाकार घेऊन बँक प्रशासन व गोपाल गायके यांच्यात समन्वय घडवून आणला. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
लेखी आश्वासन
त्रुटी दूर करून नवीन कर्ज प्रकरण सादर केले तर त्याला मंजुरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलबाग सिंग यांनी गायके याला दिले. त्यानंतर गोपालने आपले आंदोलन मागे घेतले. कर्जासाठी शेळ्यांसह झालेले उपोषण चर्चेचा विषय झाले होते.