'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 10:08 AM2023-10-24T10:08:04+5:302023-10-24T10:10:25+5:30
गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
जालना- गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज मंगळवार २४ ऑक्टोबरला संपत आहे, अजुनही सरकारकडून कोणतीच घोषणा केलेली नाही. आजचा दिवस शेवटचा असणार आहे. आज आरक्षण जाहीर केले नाहीतर पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन कसे असणार आहे याची माहिती दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. आज किंवा उद्या कोणतीही घोषणा झाली नाहीतर तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार. नेत्यांनी आमच्या गावात यायच नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.
" मराठा समाजाने नेत्यांना आतापर्यंत आपलं समजलं होतं. आता तुम्ही आरक्षण घेऊन या मगच तुम्हाला आम्ही गावात घेतो, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत नेत्यांना गावात बंदी असणार आहे. आम्ही तुम्हाला आरक्षण मागितलं आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
१ कोटी ४० लाख कागदपत्रांचा तपास
मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे कामकाजही अद्याप संपले नसून अवघ्या महिनाभरात कोट्यवधी कागदपत्रांतील नोंदी तपासणे समितीला अशक्य झाले आहे.
मोडी आणि ऊर्दू लिपीतील १ कोटी ४० लाख कागदपत्रे तपासण्यात आली असून, आणखी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी कमिटी २६ ऑक्टोबरपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करीत आहे. समितीचा आणखी अभ्यास करायचा असल्याने २ महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.