महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:02 AM2019-09-19T01:02:47+5:302019-09-19T01:03:26+5:30
महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी, युवकांनी बुधवारी सकाळी बँकेसमोर उपोषण सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दाभाडी : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी, युवकांनी बुधवारी सकाळी बँकेसमोर उपोषण सुरू केले.
बदनापूर तालुक्यातील दाभाडी (वा.) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विजय मुळे यांच्या कामकाजाबाबत दाभाडी परिसरातील नागरिक, सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी उपोषणास सुरूवात करण्यात आली. पीककर्ज वाटप, बेरोजगारांचे कर्ज, मुद्रा लोण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फाईली यासह इतर कामे वेळेवर होत नाहीत. कर्ज कमी प्रमाणात मिळते, अनेकांचे प्रस्ताव पडून आहेत, यासह इतर आरोप आंदोलकांनी केले आहेत. तसेच बँकेत दलालांचा वावर वाढला असून, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी बबन जैवाळ, सलीम कुरेशी, रावसाहेब जैवाळ, कृष्णा टेकाळे, एकनाथ पवार, राजेंद्र जैवाळ, कृष्णा भेरे, संदीप बकाल, भगवान बकाल, इम्रान बागवान, जुल्फेकार बागवान, भगवान टेकाळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, याबाबत मुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.