११३४ जणांचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:19+5:302021-01-15T04:26:19+5:30
बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या ४३१ जागांसाठी ११३४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार आहे. मतदानप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय ...
बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या ४३१ जागांसाठी ११३४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार आहे. मतदानप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
बदनापूर तालुक्यातील जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ५४ ग्रामपंचायतींतील एकूण १८६ प्रभागांमधील ४३१ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. या तालुक्यातील ४१,४३३ पुरुष व ३७,०५९ महिला असे एकूण ७८,४९२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील दावलवाडी ग्रामपंचायतीत दोन, दूधनवाडी ग्रामपंचायतीत एक, सागरवाडी ग्रामपंचायतीत सात, ढासला ग्रामपंचायतमध्ये चार, भराडखेडा ग्रामपंचायतीत १, अंबडगाव ग्रामपंचायतीत ७, चित्तोड ग्रापमध्ये एक, नजीक पांगरी ग्रामपंचायतीत एक, पाडळी-रामखेडा ग्रामपंचायतीत सहा, म्हसला-भातखेडा ग्रामपंचायतीत ९, विल्हाडी ग्रामपंचायतीत तीन, नांदखेडा ग्रामपंचायतीत सात, राजेवाडी (खो) ग्रामपंचायतीत सात, मालेवाडी (सुं.) ग्रामपंचायतीत दोन, वंजारवाडी ग्रामपंचायतीत चार, वाल्हा ग्रामपंचायतीत नऊ, आन्वी राळा ग्रामपंचायतीत एक, धोपटेश्वर ग्रामपंचायतीत एक अशा १८ ग्रामपंचायतींतील ७३ उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. आता ४३१ जागांसाठी दुरंगी, तिरंगी लढत होणार आहे.
६६८ कर्मचारी पाहणार काम
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६३ मतदान केंद्रे आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण चार असे ६५२ कर्मचारी मतदान प्रक्रियेचे काम पाहणार असल्याची माहिती तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार दळवी, शिंदे यांनी दिली.
तगडा बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १२ पोलीस अधिकारी व २१५ कर्मचारी, होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तालुक्यात दाभाडी, दावलवाडी, नानेगाव, बावणेपांगरी, मानदेऊळगाव आदी संवेदनशील गावे असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.
मतमोजणीकरिता दहा टेबल
तालुक्यातील ग्रापमधील मतदान संपल्यानंतर १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. याकरिता दहा टेबल व ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेबल क्रमांक निहाय गावांची मतमोजणी करण्यात येणार आहे.