पोटच्या मुलीवर पित्याने केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:15 AM2019-12-13T01:15:46+5:302019-12-13T01:16:09+5:30
अत्याचार करणाऱ्या पित्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी परतूर येथील पीडित अल्पवयीन मुलीने ९ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अत्याचार करणाऱ्या पित्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी परतूर येथील पीडित अल्पवयीन मुलीने ९ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले. पीडितेच्या उपोषणानंतर मुंबई येथील आझाद पोलीस ठाण्यात झिरोने गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याची कागदपत्रे मिळाल्यानंतर बुधवारी परतूर पोलीस ठाण्यात पित्यासह आई, दोन मावश्या व एका व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर शहरात राहणाºया एका १६ वर्षीय मुलीने परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलीचे वडील सन २०१८ पासून तिच्यावर जबरी अत्याचार करीत होते. हा प्रकार तिने आईस सांगितला. मात्र, हा प्रकार कोणास सांगू नको म्हणून आई पीडितेला वारंवार मारहाण करायची. नंतर पीडितेला मामासोबत पाठविण्यात आले. तेथे त्या मुलीने दोन मावश्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनीही पीडितेला मारहाण केली. नंतर तिला आजीकडे एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तेथे असताना तिचे वडील आणि त्यांचा मित्र तेथे आला. वडिलांच्या मित्राने ‘हिला मी समजावतो’, असे म्हणत घरातील सर्वांना बाहेर काढले. ‘तुझ्या बापाने तुझ्यावर जबरी अत्याचार केलेला मला माहिती आहे. मी तुझ्याशी लग्न करतो, तू इथून बाहेर जाऊ शकत नाही, परतूरचे पोलीस माझ्या पायामध्ये आहेत’, असे म्हणत धमकी दिली. तसेच विनयभंग केला. त्यानंतर पीडितेने ८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे मावशीची नजर चुकवून घरातून सुटका करून घेतली आणि ९ डिसेंबर रोजी मुंबई येथे पोहोचली.
फलकावर ‘मुझे इन्साफ चाहिए’ असा उल्लेख करून ती आझाद मैदानाच्या गेटवर थांबली. त्यावेळी एका महिलेने तिला आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेऊन सोडले.
पीडितेने तेथील पोलिसांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या पित्यासह आई, मावश्या व इतर एकाविरूध्द शून्यने गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कागदपत्रे बुधवारी परतूर पोलीस ठाण्यात आली. कागदपत्रे आल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच परतूर पोलिसांनी पीडित मुलीच्या पित्यासह त्याच्या मित्राला जेरबंद केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आईसह दोन मावशी फरार
या प्रकरणात आरोपी असलेली पीडितेची आई व दोन मावश्या अद्याप फरार आहेत. त्या तिघींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.