गरोदर मुलीचा पित्यानेच नातेवाईकाच्या मदतीने घोटला गळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 02:23 PM2018-11-27T14:23:20+5:302018-11-27T14:24:10+5:30

तालुक्यातील धावडा-मेहेगाव रोडवर सोमवारी सकाळी छाया समाधान डुकरे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

The father murdered the pregnant daughter with the help of a relative in Jalana | गरोदर मुलीचा पित्यानेच नातेवाईकाच्या मदतीने घोटला गळा 

गरोदर मुलीचा पित्यानेच नातेवाईकाच्या मदतीने घोटला गळा 

Next

भोकरदन (जालना) : तालुक्यातील धावडा-मेहेगाव रोडवर सोमवारी सकाळी छाया समाधान डुकरे या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता लग्नाआधी गरोदर राहिल्याने तरुणीचा तिच्या वडिलांनीच नातेवाईकांच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या वडिलासह चार जणांना अटक केली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, सोमवारी सकाळी (दि.26) तालुक्यातील धावडा-मेहेगाव रोडवर एका २० वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सपोनि सुदाम भागवत, उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, रामेश्वर शिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, लक्ष्मण चौधरी, विकास जाधव, बनकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 

अधिक माहिती घेतली असता पोलिसांना पॅन व एटीएम कार्डच्या आधारे तरुणीचे नाव छाया समाधान डुकरे असून ती जांब ता.जि बुलढाणा येथील रहिवासी असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी सोमवारी रात्रीच जांब येथे जात तरुणीच्या घरी चौकशी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तरुणीचे वडील समाधान डुकरे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी छायाच्या खुनाची कबुली दिली. तसेच या खुनात सहभागी नातेवाईकांची माहिती दिली. यावरून पोलिसांनी छायाचा मावसा महादू उगले ( रा. रुईखेड मायबा ता जि बुलडाणा ), आण्णा (गणेश) लोखडे (रा. सोनगिरी ) व रामधन दळवी (रा. येवता ता. जाफराबाद जि. जालना) यांना ताब्यात घेतले. 

या कारणामुळे केली हत्या  
छाया ही पुण्यात शिक्षण घेत होती.यासोबतच ती खाजगी नोकरीसुद्धा करायची. याच दरम्यान तिचे शुभम वराडे ( भुसावळ) याच्या सोबत प्रेम संबंध होते. यातून ती गर्भवती राहिली. दिवाळीनिमित्त सुट्यात छाया घरी आली असता तिने आईवडिलांना याची माहिती दिली. यानंतर छायाच्या वडिलांनी तिला सोबत घेत महादू उगले, आण्णा (गणेश) लोखडे व रामधन दळवी या नातेवाईकांसोबत शुभमच गाव गाठले. मात्र येथे आले असता त्याचा फोन बंद होता. खूप प्रयत्न केल्यानंतरही त्याचा संपर्क न झाल्याने ते परत निघाले. मात्र, यामुळे समाजात आपली बदनामी होईल या कारणाने छायाच्या वडिलांनी सोबतच्या नातेवाईकांच्या मदतीने मेहेगाव शिवारात तिचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह धावडा-मेहेगाव रोडवर टाकून ते घराकडे परतले.

Web Title: The father murdered the pregnant daughter with the help of a relative in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.