मुलाला वर्दीत पाहण्याचे स्वप्न राहिले अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:55 AM2019-04-02T00:55:00+5:302019-04-02T00:55:29+5:30

सैनिकी प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या मुलाच्या साहित्याची जुळवाजुळव करीत असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Father's dream of watching the son in uniform remained insufficient | मुलाला वर्दीत पाहण्याचे स्वप्न राहिले अपुरे

मुलाला वर्दीत पाहण्याचे स्वप्न राहिले अपुरे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : आपल्या मुलाने सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी ही त्यांची मनोकामना. त्यासाठी ते मुलाला नेहमी प्रेरणा देत असायचे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा पक्का निर्धार मुलानेही केला होता. अन् सैन्य भरतीसाठी त्याची निवडही झाली. मात्र, नियतीच्या मनात वेगळाच डाव सुरू होता. सैनिकी प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या मुलाच्या साहित्याची जुळवाजुळव करीत असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका डोळ््यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू घेऊन नियतीच्या या विचित्र चक्राला सध्या जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथील सवडे परिवार सामोरे जात आहे. नांदखेडा या छोट्या गावातील सूर्यभान भीमराव सवडे (४७) यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या दोन मुलांपैकी लहान मुलगा सोमीनाथ याने सैन्य भरती होवून देशसेवा करावी ही त्यांची अतीव इच्छा. मुलानेही वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतला होता. नुकतेच जळगाव येथे पार पडलेल्या सैन्य भरती प्रक्रियेत सोमीनाथची निवडही झाली होती. मुलाच्या निवडीच्या आनंदात वडिलांनी गावभर पेढे वाटले. रविवारी सोमीनाथ प्रशिक्षणासाठी जाणार होता. आता वडील त्याच्या सोबत द्यावयाच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी ते जवळच्या शहराला गेले होते. या दरम्यान मुलाच्या जाण्याच्या दोन दिवस अगोदर गुरूवारी रात्री त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते एका रस्ता दुर्घटनेत जागीच ठार झाले. या घटनेने सवडे कुटुंबाचा आनंद क्षणात दु:खात बदलून गेला.
अशा वेळी वडिलांच्या निधनाचे दु:ख गिळून अशा नाजूक स्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत सोमीनाथने प्रशिक्षणासाठी जाण्याचा निश्चय केला. कारण त्याला वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. जिवंतपणी वडील मला वर्दीत पाहू शकले नाहीत याचे शल्य आयुष्यभर बोचत राहील. तरीही अखंड देशसेवा करून त्यांच्या आत्म्याला शांती देण्याचा प्रयत्न मी करेन, अशी भावना डोळ््यात आसवं आणून सोमनाथने व्यक्त केली.

Web Title: Father's dream of watching the son in uniform remained insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.